येत्या दोन दिवसात शाळानिहाय शिक्षक नेमणूक प्रक्रियेला प्रारंभ : मराठी माध्यम हायस्कूल सुरू करण्यासाठी पाठपुरावा
खानापूर : खानापूर तालुक्यासाठी 438 अतिथी शिक्षक शिक्षण खात्याने मंजूर केले आहेत. येत्या दोन दिवसात संपन्नमूल अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर तालुक्यातील शाळांतील शिक्षकांची कमतरता जाणून घेऊन प्रत्येक शाळेत जास्तीत जास्त शिक्षक पुरविण्यासाठी प्रयत्न करणार येणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी पी. रामप्पा यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. अतिथी शिक्षक मंजूर झाल्याने तालुक्यातील शिक्षकांची समस्या बऱ्याच अंशी मार्गी लागणार आहे. मात्र मराठी शाळेत मोठ्या प्रमाणात शिक्षकांची कमतरता असल्याने दुर्गंम भागातील शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण होत नसल्याचे तालुक्यात चित्र आहे. खानापूर तालुक्यात शिक्षकांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. गेल्या काही वर्षापासून अतिथी शिक्षकावरच शाळा चालवल्या जात आहेत.
खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील दुर्गंम भागात तसेच दक्षिण भागातील शाळेत अतिथी शिक्षक जाण्यासाठी तयार होत नाहीत. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. शासन कायमस्वरुपी शिक्षक भरून घेण्यास तयार नसल्याने अतिथी शिक्षकावर शाळा चालवल्या जात आहेत. दरवर्षी जून महिन्यात अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्यात येते. मार्च महिन्यात सेवेतून मुक्त करण्यात येते. त्यामुळे दरवर्षी अतिथी शिक्षकांना नेमणूक घेण्याची प्रक्रिया राबवावी लागत आहे. यावर्षी खानापूर तालुक्यासाठी 438 अतिथी शिक्षकांची मंजुरी देण्यात आली आहे. कन्नड, मराठी, उर्दू या तिन्ही मातृभाषेसाठी 438 शिक्षकांवर भागवावे लागणार आहे. त्यामुळे गटशिक्षणाधिकाऱ्यांची शिक्षक नेमणूक करताना कसोटी लागणार आहे.
मराठी माध्यमाच्या हायस्कूलसाठी शासनाकडे पाठपुरावा
शहरात मराठी माध्यमाचे हायस्कूल नसल्याने शहरासह जवळपासच्या विद्यार्थ्यांना खासगी शाळांवरच अवलंबून रहावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षापासून शहरात शासकीय मराठी हायस्कूल मंजूर करण्यात यावे, यासाठी माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी प्रयत्न केले होते. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी शहरात मराठी माध्यमाचे हायस्कूल मंजूर करण्यात यावे, यासाठी शिक्षण विभागाकडे लेखी निवेदन देवून मागणी करण्यात आली आहे. याबाबत शिक्षण खात्याकडे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. यावर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून मराठी माध्यमाच्या हायस्कूलला परवानगी मिळण्याची दाट शक्यता असल्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना जाहीर केले आहे.









