लोणावळा : घाटमाथ्यावरील पावसाचे माहेरघर असलेल्या लोणावळा शहरात मंगळवारी (18 जुलै) 24 तासात 220 मिमी (8.66 इंच) पावसाची नोंद झाली आहे. आज बुधवारी देखील पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने पुढील तीन चार दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मागील दोन दिवसात शहरात तब्बल 432 मिमी पाऊस झाला आहे.
लोणावळा शहरात जून महिन्यापासून आजपर्यंत 1744 मिमी (68.66 इंच) पाऊस झाला आहे. मागील वर्षी आजपर्यंत 2592 मिमी (102.05 इंच) पाऊस झाला होता. सोमवारपासून पावसाचा जोर वाढल्याने शहरातील काही रस्त्यावर पाणी साचू लागले आहे. शहानी रोड, बस स्थानकाच्या बाहेरील रस्ता, बाजारातील रस्ते, रायवुड भागातील रस्ते, नांगरगाव वलवण रस्त्यावर पाणी साचले आहे. भोंडे हायस्कूलच्या गेटसमोरील दोन्ही रस्त्यावर पाणी भरल्याने मुलांना पाण्यातून शाळेत जावे लागत आहे. लोणावळा धरणाच्या पायथ्याजवळ मोठय़ा प्रमाणात पाणी साचले आहे. मुंबई पुणे-राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा येथे सातु हॉटेलसमोर मोठय़ा प्रमाणात पाणी साचले आहे तसेच खंडाळ्यातील पोस्ट कार्यालयाच्या मागील पुलाखाली मोठय़ा प्रमाणात पाणी साचले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास सकल भागातील देखील पाणी साचण्याची शक्यता आहे.
पवना धरणात 40.44 टक्के साठा
लोणावळा व पवनानगर परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पवना धरणाच्या पातळीमध्ये झपाटय़ाने वाढ होऊ लागली आहे. मागील 24 तासात पवना धरण परिसरात 93 मिमी पाऊस झाला असून, धरण साठय़ात 5.15 टक्के वाढ झाली आहे. आज सकाळी 7 वाजता पवना धरणात 40.44 टक्के पाणीसाठा झाला आहे. जून महिन्यापासून आजपर्यंत धरण परिसरात 927 मिमी पाऊस झाला आहे. तर मागील वर्षी 1427 मिमी पाऊस झाला होता. धरण परिसरात व मावळात सुरु असलेल्या पावसामुळे गहुंजे-साळुंबे हा साकव पूल पाण्याखाली गेला आहे. वडिवळे भागातील कच्चा पूल पंधरा दिवसापूर्वीच वाहून गेल्याने त्या भागातील नागरिकांना गोवित्रीवरुन वळसा मारुन यावे लागत आहे. यासह अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. वाकसई चाळ भागात इंद्रायणी नदीला पूर आला असून पाणी परिसरातील मोकळ्या जागेत पसरले आहे. वाकसई गावाती भातशेती देखील पाण्याखाली गेली आहे.








