कदंब-जनता यांच्या अतूट नात्याचे दर्शन : कोविडच्या काळातही केले मोठे कार्य
पणजी : राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या कदंब परिवहन महामंडळ लि. च्या कदंब बसने गेली 43 वर्षे जनसेवा केली आहे. कदंब आणि जनता यांच्यात अतूट नाते निर्माण झाले आहे. खासगी बसेस लॉबीच्या जाचातून कदंबने जनतेची, विशेषत: विद्यार्थीवर्गाची सुटका केली आहे. परंतु कदंब आजही सरकारी अनुदान मिळूनही तोट्यात चालते, हे ही तेवढेच लक्षात घ्यावे लागते. 19 ऑक्टोबर 1980 साली दसऱ्यादिनी सुरुवात झालेल्या कदंब बससेवेला आज मंगळवारी दसऱ्यादिनी 24 ऑक्टोबर 2023 रोजी 43 वर्षे पूर्ण होऊन 44 व्या वर्षात पदार्पण होत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी लोकांचे जीवनमान उंचावे या ध्येयातून सुरु केलेली ही कदंब बससेवा आज जनतेच्या मनात प्रेमाचे स्थान निर्माण करून आहे. पहिल्या दिवशी तिसवाडीतील आगशी ते सत्तरी तालुक्यातील धावे या मार्गावर कदंब धावली होती. तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. 43 वर्षांच्या खाचखळग्यांतून कदंबने आपली धाव यशस्वी करून दाखवली असून, आधुनिकतेची कास धरताना आज कदंबने इलेक्ट्रिक बसेसही सेवेत समाविष्ट करून घेतल्या आहेत. कदंबच्या ताफ्यात सध्या 536 बसेस धावत आहेत. त्यापैकी इलेक्ट्रिक व्हेईकल ऑलेट्रा 51 बसेस तसेच कोंडुसकर कंपनीच्या चार बसेस भाडेतत्त्वावर कार्यरत आहेत.
कोविडच्या काळात मोठे कार्य
कदंब महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, चालक व वाहक यांच्या प्रामाणिक सेवेमुळे कदंबने लोकांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले आहे. ‘कोविड-19’ या संकट काळात कर्मचारी व चालक, वाहक यांनी दाखवलेले धारिष्ट्या तसेच परराज्यात असणाऱ्या गोमंतकीय नागरिकांची घरवापसी करताना आपल्या कुटुंबाचा आणि स्वत:च्या जीवाचा विचार न करता प्रामाणिक सेवेला महत्त्व दिले. कोविड काळात गुजरात, राजस्थान, केरळ आदी ठिकाणी अडकलेल्या गोमंतकीयांना राज्यात सुखऊप आणण्याचे काम कदंबच्या कर्मचाऱ्यांनी करून दाखवले आहे.
‘माझी बस’ अंतर्गत 55 बसेस
सरकारने सुरू केलेल्या ‘माझी बस’ या योजनेअंतर्गत कदंबच्या 55 बसेस सेवेत आहेत. पोळे – काणकोण – मडगाव, सावर्डे-मडगाव, सावर्डे – केपे – बाळ्ळी – काणकोण या मार्गावर त्या सध्या सेवा देत आहेत. वातानुकूलित, आरामदायी कदंबच्या बसेस सध्या कर्नाटक, महाराष्ट, तेलंगण (हैदराबाद) या ठिकाणी सेवेत आहेत. दरवर्षी कदंबचे उत्कृष्ट चालक, उत्कृष्ट वाहक व उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरव करण्यात येतो. यामध्ये सुमारे 56 जणांचा सहभाग असतो. कर्मचाऱ्यांच्या दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या मुलांचा सन्मान करण्यात येतो. हा सन्मान सोहळा दरवर्षी कदंबच्या स्थापनादिनी म्हणजे दसरा सणाला होतो. दरवर्षीप्रमाणे यंदा आज मंगळवारी हा सोहळा पणजी येथील कदंब बसस्थानकाच्या परिसरात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थित होईल, असे कदंब महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार उल्हास तुयेकर यांनी सांगितले.
अतिदुर्गम भागातही कदंब बससेवा
सांगे, केपे तालुक्यातील अतिदुर्गम भागातही कदंबची बससेवा सुरू आहे. सांगे तालुक्यातील माणगड व वाळपईतील साट्रे, साळजिणी या दुर्गम क्षेत्रातही कदंब कर्मचारी लोकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. कदंब बसेस एकूण 304 मार्गावर धावत आहेत. दिवसाला सर्व बसेस सुमारे 85 हजार किलोमीटरचे अंतर कापत असल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी रॉक लुईस यांनी सांगितले.
तब्बल 40 ते 70 टक्के सवलत पास योजना
कदंबने 2012-2013 मध्ये सवलत पास योजना सुरू केल्यानंतर तिचा फायदा नागरिकांबरोबरच विद्यार्थ्यांनाही होत आहे. यामध्ये पास योजनेतून नागरिकांसाठी 40 टक्के तर विद्यार्थ्यांसाठी 70 टक्के सवलत देण्यात येत असल्याचे कदंबचे महाव्यवस्थापक संजय घाटे यांनी सांगितले.










