कोरोना पॉझिटिव्ह आल्यास देशातील कोणत्याही रुग्णालयात घेता येणार उपचार
सरपंचांना विमा कवच देणारी सिंधुदुर्ग राज्यातील पहिली जिल्हा परिषद
प्रतिनिधी / ओरोस:
कोरोना काळात सरकारच्या आदेशान्वये काम करणाऱया सरपंचांना जिल्हा परिषदेने एक लाखांचे विमा कवच दिले आहे. स्वनिधीतून हे कवच देण्यात आल्याची माहिती जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी दिली. हा अभिनव उपक्रम राबविणारी सिंधुदुर्ग ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे.
कोरोना महामारीत गावपातळीवर सरपंच प्रंट लाईनवर्करचे काम करत आहे. विमा कवच देण्याची मागणी सरपंच संघटनेने राज्य सरकारकडे केली होती. पालकमंत्री उदय सामंत यांचेही लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, अद्याप याबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे कोरोना काळात काम करणाऱया सरपंचाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आतापर्यंत जिल्हय़ात दोन सरपंच आणि एक उपसरपंच अशा तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
दरम्यान, कोरोना काळात राबणाऱया सरपंचांसाठी जि. प. सरसावली असून स्वनिधीतून विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. पदाधिकाऱयांनी घेतलेल्या निर्णयाला जि. प. प्रशासनातील अधिकाऱयांनीही चांगली साथ दिल्याचे संजना सावंत यांनी स्पष्ट केले.
नऊ महिने विमा संरक्षण
न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून पुढील नऊ महिने कालावधीसाठी एक लाखाची विमा पॉलिसी देण्यात आली आहे. 428 सरपंचांच्या या पॉलिसीसाठी जि. प. ने 7 लाख 89 हजार 365 रुपये खर्च केले आहेत. 9 लाख 28 हजार 664 एवढा एकूण खर्च अपेक्षित होता. मात्र, त्यात विमा कंपनीने 1 लाख 39 हजार 299 रुपये सवलत दिली आहे. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास देशभरातील कोणत्याही रुग्णालयात एक लाखा पर्यंतचे उपचार घेता येणार आहेत.
जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर आणि जिल्हा परिषद
प्रशासनातील अधिकाऱयांनी सहकार्य केल्यामुळे जिल्हा परिषदेत चांगले काम करता आले. यापुढेही जिल्हा परिषद विविध प्रश्नांवर चांगले काम करेल, असेही सावंत यांनी सांगितले.
15 सरपंचांना प्रातिनिधीक स्वरुपात जि. प. अध्यक्षा सावंत यांच्या हस्ते पॉलिसी सुपुर्द करण्यात आली. यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, सभापती अंकुश जाधव, शर्वाणी गावकर, सभापती डॉ. अनिशा दळवी, माजी सभापती सावी लोके, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी सभापती संतोष साटविलकर उपस्थित होते.
नागेश अहिर (रांगणा तुळसुली), गुरुप्रसाद वायंगणकर, (असलदे), संजय सावंत (दारिस्ते), विठ्ठल तेली (आंब्रड), विनोद सुके (रामेश्वर), अक्रम खान (बांदा), तुकाराम साहिल (पणदूर), वैदेही गुरव (जांभवडे), राजाराम जाधव, (नरल)s, नारायण मांजरेकर (अणाव), विश्राम सावंत (कुणकेरी), मंगेश तळगावकर (करंज), महादेव धुरी, (तळकट), शंकर घारे (तुळस), मनोज उगवेकर (शिरोडा), नागेश परब (बाव) यांना पॉलिसीचे वितरण करण्यात आले.









