डीएसीकडून 3 प्रस्तावांना हिरवा झेंडा ः सैन्य अन् नौदलाचे बळ वाढणार
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चीनसोबतच्या सीमेवरील तणावादरम्यान सैन्य आणि सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. संरक्षण अधिग्रहण परिषदेने शस्त्रास्त्र अन् संरक्षण उपकरणांच्या तीन प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. भारतीय सैन्याचे दोन आणि नौदलाचा एक प्रस्ताव यात सामील असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. या तिन्ही प्रस्तावांसाठी एकूण 4,276 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
संरक्षण अधिग्रहण परिषदेने (डीएसी) हेलिना अँटी-टँक गायडेड क्षेपणास्त्र, लाँचर आणि संबंधित सहाय्यक उपकरणांच्या खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या उपकरणांना अत्याधुनिक हेलिकॉप्टर्सवर जोडले जाणार आहे. ही शस्त्रास्त्रs तसेच संरक्षण उपकरणे सामील होणार असल्याने सैन्याची क्षमता मजबूत होणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
याचबरोबर डीआरडीओकडून विकसित करण्यात आलेल्या व्हीएसहोराड (आयआर होमिंग) क्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदीकरता डीएसीकडून मंजुरी मिळाली आहे. संरक्षण अधिग्रहण परिषदेने नौदलासाठीच्या एका प्रस्तावालाही हिरवा झेंडा दाखविला आहे. याच्या अंतर्गत नौदलासाठी शिवालिक शेणीच्या युद्धनौका आणि पुढील पिढीच्या मिसाइल वेसल्स (एनजीएमव्ही)साठी ब्राह्मोस लाँचर तसेच फायर कंट्रोल सिस्टीम (एफसीएस)ची खरेदी केली जाणार आहे.









