प्रतिनिधी/ पणजी
मनपा, सहा पालिका, 17 ग्रामपंचायती, नावेली जिल्हा पंचायत आणि सांखळी पालिकेच्या एका प्रभागासाठी शनिवारी राज्यात झालेली निवडणूक व पोटनिवडणूक कोणताही अनूचित प्रकार न घडता अत्यंत शांततेत आणि तेवढय़ाच उत्साहात पार पडली. त्याद्वारे एकूण 423 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत सीलबंद झाले, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सहाय्यक संचालक सागर गुरव यांनी दिली.
रात्री उशिरा आल्तिनो येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी निवडणूक आयुक्तांचे विशेष सेवा अधिकारी डॉ. दुर्गाप्रसाद आणि आशुतोष आपटे उपस्थित होते. उद्या दि. 22 रोजी होणारी मतमोजणी निवडणुकीच्या निर्धारित कार्यक्रमानुसार होणार असली तरी त्यासंबंधी नक्की माहिती खास परिपत्रकाद्वारे आज देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. मतमोजणीनंतर सर्व उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
मनपासह पेडणे, डिचोली, वाळपई, कुडचडे-काकोडा, कुंकळ्ळी व काणकोण या सहा पालिका. तसेच बस्तोडा, ओशेल, वेर्ला काणका, हरमल, कोरगाव, मोरजी मेरशी, आगशी, सर्वण कारापूर, मुळगाव, म्हाऊस, पिसुर्ले, वेलिंग-प्रियोळ-कुंकळये, असोळणा, नावेली, बाळ्ळी-अडणे, भाटी या पंचायती. नावेली जिल्हा पंचायत आणि सांखळी पालिकेचा प्रभाग क्र. 9 साठी ही निवडणूक घेण्यात आली.
मनपाची निवडणूक इलेक्ट्रॉनिक यंत्रांद्वारे तर अन्य सर्व ठिकाणी मतपत्रिकांच्या माध्यमातून घेण्यात आली. त्यात मनपासाठी 70.19 टक्के मतदान झाले. पालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत पेडणेत सर्वाधिक 91.02 टक्के, डिचोलीत 87.96 टक्के, कुडचडे 80.24 टक्के, वाळपईत 85.50 टक्के, काणकोणमध्ये 86.88 टक्के आणि कुंकळ्ळीत सर्वात कमी 76.35 टक्के एवढे मतदान झाले. पालिका निवडणुकीत 25785 पुरूष व 27886 महिला मिळून एकूण 53671 (83.19 टक्के) मतदारांनी आपला हक्क बजावला. वाळपईच्या 10 पैकी प्रभाग 8 चा उमेदवार बिनविरोध विजयी झाला होता.
पोटनिवडणूक झालेल्या सांखळीत 87.67 टक्के, नावेली जिल्हा पंचायतीसाठी 57.52 टक्के तर सर्व ग्रामपंचायतींच्या 18 प्रभागांसाठी 83.80 टक्के एवढे मतदान झाले.
मतदान सकाळी 8 वाजता सुरू झाले. मनपासाठी झालेल्या निवडणुकीसाठी सकाळच्या सत्रात अनेक मतदार उत्स्फूर्तपणे बाहेर पडले. त्यामुळे भाटले, आल्तिनो, फार्मसी महाविद्यालय, आदी अनेक मतदान केंद्रांवर रांगा दिसून आल्या. सकाळच्या सत्रात दुपारी 2 पर्यंत पणजी मनपासाठी 49.39 टक्के मतदान झाले होते. तसेच पेडणेत 71.65 टक्के, डिचोलीत 59.39 टक्के, कुडचडे 56.71 टक्के, कुंकळ्ळीत 53.09 टक्के, वाळपईत 59.58 टक्के आणि काणकोणमध्ये 66.07 टक्के असे मतदान झाले होते.
पोटनिवडणूक झालेल्या ठिकाणी सांखळीत दुपारी 2 पर्यंत 68.49 टक्के, नावेली जिल्हा पंचायतीसाठी 41.48 टक्के तर सर्व ग्रामपंचायतींसाठी 64.95 टक्के एवढे मतदान झाले होते.