दुष्काळात ठरणार आधार, पिकांचे होणार संरक्षण
बेळगाव : दुष्काळी परिस्थितीत आधार ठरणाऱ्या पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील 42,805 शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे. यामध्ये सौंदत्ती, रामदुर्ग आणि बैलहोंगल तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत खरिप हंगामातील पिकांना संरक्षण दिले जाते. दुष्काळी परिस्थिती, पूर, अतिवृष्टी, कीड आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना फटका बसत असतो. अशा परिस्थितीत ही विमा योजना आधार ठरणारी आहे. यंदा जिल्ह्यात 7.10 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी 4 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे. यंदा पावसाअभावी एकूण पेरणी क्षेत्रात घट झाली आहे. तर काही ठिकाणी पावसाअभावी पिकांना धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत विमा योजना लाभदायक ठरणार आहे. खरिप हंगामातील भात, मका, ज्वारी, मूग, उडीद, भुईमूग, कापूस, सोयाबीन, सूर्यफूल, बाजरी, नाचणा, कांदा, बटाटा, टोमॅटो, हळद आदी पिकांसाठी पीकविमा योजना लागू आहे. शेतकऱ्यांनी या पिकांसाठी विमा भरला आहे. विशेषत: रामदुर्ग, सौंदत्ती आणि बैलहोंगल तालुक्यातील पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. बेळगाव तालुक्यात पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. मात्र यंदा पाऊस कमी झाल्याने पीकविमा योजना लाभदायी ठरली असती.
पीकविमा लाभदायी ठरणार
जिल्ह्यातील 42,805 शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे. अद्यापही शेतकऱ्यांमध्ये पीकविम्याविषयी जागृती नसल्याचे दिसत आहे. मात्र बैलहोंगल, सौंदत्ती, रामदुर्ग तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीकविम्याला प्रतिसाद दिला आहे. नैसर्गिक संकटे, दुष्काळ अशा परिस्थितीत पीकविमा अत्यंत लाभदायी ठरणार आहे.
-शिवनगौडा पाटील (सहसंचालक कृषी खाते)









