सौंदत्ती विधानसभा मतदारसंघात कारवाई
बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना वाटप करण्यासाठी आणलेल्या शिलाई मशीन्स, टिफिन बॉक्स अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. सौंदत्ती येथे ही कारवाई करण्यात आली असून निजदच्या उमेदवाराशी संबंधित सुमारे 42 लाख रुपयांहून अधिक किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. सौंदत्ती विधानसभा मतदारसंघातील निजदचे उमेदवार आनंद चोप्रा यांच्या गोदामावर पोलीस, निवडणूक विभागाचे अधिकारी व जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे छापा टाकून तपासणी केली. या गोदामात 42 लाख 92 हजार 112 रुपये किमतीचे साहित्य आढळून आले. त्यामुळे गोदामाला टाळे ठोकण्यात आले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 1012 शिलाई मशीन्स, या शिलाई मशीन्सचे 1200 टेबल्स, मशीन्सला जोडून इस्त्राr करण्यासाठी लागणारे 1060 टेबल्स, 2160 टिफिन बॉक्स जप्त करण्यात आले. एफएसटी पथकाचे मोहन करेहनुमंतप्पा यलिगार यांनी सौंदत्ती पोलीस स्थानकात संबंधित उमेदवाराविरुद्ध फिर्याद दिली आहे.









