पेलिसांसाठी बसेस बुकिंग, इतर मार्गांवर कमतरता होत असल्याने प्रवाशांची गैरसोय
बेळगाव : जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, निवडणुकीच्या कामासाठी परिवहनच्या 42 बसेस बुकिंग केल्या आहेत. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील इतर मार्गांवर बसफेऱ्यांची कमतरता जाणवू लागली आहे. विशेषत: बसफेऱ्या कमी झाल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. निवडणूक यंत्रसामग्री आणि पोलिसांच्या वाहतुकीसाठी या बसेसचा वापर होणार आहे. जिल्ह्यात 18 मतदारसंघांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. प्रक्रिया पारदर्शकपणे होण्यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. दरम्यान निवडणुकीच्या कामासाठी विविध मार्गांवर परिवहनच्या 42 बसेस धावत आहेत. त्यामुळे शहरातील इतर मार्गांवर बसेसची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांची प्रतीक्षा करावी लागत आहे. निवडणूक काळात व्हीव्हीपॅट, ईव्हीएम, अधिकारी, पोलीस आणि कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी या बसेसचा वापर होत आहे.
परिवहनच्या महसुलात वाढ
मध्यवर्ती बसस्थानकातून दररोज 650 हून अधिक बसेस विविध मार्गांवर धावतात. यापैकी काही बसेस आता निवडणुकीच्या कामासाठी धावत आहेत. 10 मे रोजी निवडणूक होणार आहे. तर 13 मे रोजी निकाल आहे. या काळात बुक केलेल्या 42 बसेस विविध ठिकाणी धावणार आहेत. तसेच इतर कामांसाठी पुन्हा परिवहनच्या बसेस बुकिंग केल्या जाणार आहेत. त्यामुळे स्थानिक बस वाहतुकीवर ताण वाढणार आहे. शिवाय दैनंदिन बस वाहतुकीवरही परिणाम होणार आहे. 58 रुपये प्रति किलोमीटरप्रमाणे बसेस बुक केल्या जात आहेत. त्यामुळे परिवहनच्या महसुलात वाढ होत आहे. परिवहनसाठी निवडणूक आर्थिकदृष्ट्या दिलासादायक ठरणार आहे.
राखीव पोलीस दलाच्या तुकड्या दाखल
जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या बेळगावात दाखल झाल्या आहेत. दररोज वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस पथसंचलनासह सेवा देत आहेत. पोलीस आणि राखीव दलातील जवानांची ने-आण करण्यासाठीही परिवहनच्या बसेस धावत आहेत.









