वृत्तसंस्था/ गुवाहाटी
बाल विवाह विरोधात आसाममधील हेमंत विश्व शर्मा सरकारने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. याप्रकरणी हाती घेण्यात आलेल्या मोहिमेच्या अंतर्गत आसाम पोलिसांनी एका दिवसात 416 आरोपींना अटक केली आहे. तसेच 335 गुन्हे नोंदविले आहेत. आसाम बाल विवाहाच्या विरोधात स्वत:ची लढाई सुरूच ठेवून आहे. आम्ही या सामाजिक कुप्रथेचे उच्चाटन करण्यासाठी साहसी पावले उचलत राहू असे उद्गार मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी काढले आहेत.
राज्य सरकार आसामच्या लोकांची ओळख कायम ठेवणे आणि त्यांच्या विकासाला सुनिश्चित करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. घुसखोरांचा प्रभाव मर्यादित करण्यासाठी परिसीमनाच्या दिशेने सरकार काम करत आहे. याचबरोबर राज्य सरकारने 10 हजार हेक्टर भूमीला अतिक्रमणापासून मुक्त करविले असल्याचा दावा शर्मा यांनी केला.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी आसाम आंदोलनातील पहिले हुतात्मा खडगेश्वर तालुकदार यांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण केले आहे. खडगेश्वर तालुकदार यांच्यापासून प्रेरित होत 800 हून अधिक हुतात्म्यांनी देखील राज्यासाठी सर्वोच्च बलिदान केले होते. आसाम आंदोलन आसाम आणि त्याच्या लोकांना अवैध घुसखोरीच्या अभिशापापासून वाचविण्याच्या संकल्पाची अभिव्यक्ती होते असे उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले आहेत.









