जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची माहिती : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या माहितीचे संकलन : 32 कोटी निधी उपलब्ध
बेळगाव : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनाला आवश्यक निधी वितरित केला आहे. सध्या 32 कोटी निधी जिल्हा प्रशासनाकडे असून जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी 410 कोटींचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीचा यापूर्वीच आढावा घेण्यात आला आहे. केंद्रीय पथकाकडून पाहणी करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडूनही जिल्ह्यातील परिस्थितीचा अहवाल घेऊन सरकारला माहिती देण्यात आली आहे. यासाठी सरकारकडून जिल्हा प्रशासनाला यापूर्वी 10 कोटी निधी देण्यात आला आहे. तर दोन दिवसांपूर्वी पुन्हा 22 कोटी निधी वितरित केला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे दुष्काळ परिस्थितीचा सामना करण्यासाठी 32 कोटी निधी उपलब्ध आहे. जिल्ह्यातील पीकहानीचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्याप्रमाणे तालुकानिहाय माहिती घेऊन सरकारला नुकसानीची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थिती पाहून सरकारकडे 410 कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना लवकरच भरपाई दिली जाणार आहे. एनडीआरएफच्या मार्गसूचीनुसार भरपाई दिली जाणार असून प्रतिहेक्टर 13500 रुपये भरपाई देण्याची मार्गसूची आहे. त्याप्रमाणे शेतकऱ्यांचा डाटा संग्रहित करण्याचे काम सुरू आहे. बहुतांश काम पूर्ण होत आले असून केंद्र सरकारकडून निधी मिळताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे पैसे जमा करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
एकरप्रमाणे निधीची मागणी
एनडीआरएफच्या मार्गसूचीनुसार ही भरपाई देण्यात येत आहे. मात्र, शेतकऱ्यांकडून भरपाई प्रतिएकर देण्यासाठी मागणी करण्यात येत आहे. भरपाई वाढवून देण्याचा प्रस्तावही शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे भरपाई देण्यासंदर्भात अद्याप कोणताच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत राज्य सरकारलाही माहिती देण्यात आली आहे. सरकारबरोबर चर्चा करण्यात आली असून ठोस निर्णय झालेला नाही. केंद्राचा निधी उपलब्ध झाल्यानंतर यावर निर्णय घेण्यात येईल. शेतकऱ्यांना त्वरित भरपाई मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांची माहिती संग्रहित करण्याचे काम सुरू असून पैसे मिळताच एका दिवसात भरपाई वर्ग करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.









