एनपीपीएने घेतला मोठा निर्णय : मधूमेहग्रस्तांना मिळणार दिलासा
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
सरकारने मधूमेह, अॅलर्जी, हृदय आणि यकृताशी संबंधित आजारांवरील उपचारासाठी सर्वसाधारणपणे वापरण्यात येणाऱ्या 41 औषधे आणि 6 फॉर्म्युलेशनच्या किमती कमी केल्या आहेत. राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाच्या (एनपीपीए) 143 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आवश्यक औषधांच्या किमती जनतेला परवडणाऱ्या असाव्यात याकरता हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. विविध औषधांच्या कमी किमतीची माहिती वितरक आणि विक्रेत्यांना द्यावी असा निर्देश औषध कंपन्यांना देण्यात आला आहे. फार्मास्युटिकल्स विभाग आणि राष्ट्रीय फार्मास्यूटिकल मूल्य निर्धारण प्राधिकरणाकडून (एनपीपीए) जारी अधिसूचनेनुसार ज्या औषधांसाठी आता तुलनेत कमी खर्च करावा लागणार आहे, त्यात अँटासिड, मल्टीव्हिटॅमिन आणि अँटीबायोटिक्स सामील आहे.
10 कोटीहून अधिक मधूमेहग्रस्त
अँटासिड सारखे औषध अपचनापासून दिलासा देण्याचे काम करते. तर मल्टीव्हिटॅमिनमुळे इम्युनिटी वाढत असते. अँटीबायोटिक्स बॅक्टेरियल संक्रमणावरील उपचारासाठी वापरले जाणारे औषध आहे. भारत हा सर्वाधिक मधूमेहग्रस्त असलेल्या लोकांचा देश आहे. भारतात 10 कोटीहून अधिक मधूमेहग्रस्त आहेत. मधूमेहावरील औषध स्वस्त झाल्याने या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मागील महिन्यात फार्मास्यूटिकल्स विभागाने 923 मेडिसीन फॉर्म्युलेशनसाठी स्वत:च्या वार्षिक सुधारित किमती आणि 65 फॉर्म्युलेशनसाठी सुधारित किरकोळ किमती जारी केल्या होत्या. या किमती एक एप्रिलपासून प्रभावी झाल्या होत्या.
औषधांच्या किमतींवर नियंत्रण
मधूमेह आणि अन्य आजार देशात मोठ्या प्रमाणात फैलावत आहेत. अशा स्थितीत याच्याशी निगडित आजारांच्या किमती कमी झाल्यास लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. औषधांच्या किमती कमी झाल्याने लोकांना उपचार करवून घेणे सोपे ठरणार आहे. सरकारी नियामक यंत्रणा एनपीपीए देशात फार्मास्यूटिकल औषधांच्या किमतीवर नियंत्रण करण्याचे काम करते.









