प्रार्थनेसाठी जमले होते 5 हजार लोक
वृत्तसंस्था / कैरो
इजिप्तच्या गीजामध्ये एका चर्चला आग लागल्यावर झालेल्या चेंगराचेंगरीत 41 जणांना जीव गमवावा लागला आहे. चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी 5 हजार लोक जमले होते. ही दुर्घटना राजधानी कैरोतील गीजा येथे घडली आहे. लहान मुले, चर्चचे पाद्री तसेच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींचा आकडा अद्याप स्पष्ट होऊ शकलेला नाही. आग लागल्याने चर्चचे मोठे नुकसान झाले आहे.
चर्चला आग लागण्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु यामागे शॉर्टसर्किट कारणीभूत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. चर्चच्या जुन्या इमारतीमुळे आग वेगाने फैलावली होती. आग लागल्यावर चर्चमधील लोक सैरावैरा पळू लागल्याने चेंगराचेंगरी घडली आहे. अनेकांचा श्वास कोंडून मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये मुलांची संख्या अधिक असल्याची भीती व्यक्त होत आहे. या चर्चमध्ये लहान मुलांचे वर्ग देखील भरत होते. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवत जखमींना नजीकच्या रुग्णालयात हलविले आहे. आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते होसम अब्देल गफ्फार यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.









