3 हजार इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त : आठ पत्रकारांचाही मृत्यू, इस्रायल गाझात शिरण्यास सज्ज
वृत्तसंस्था / तेल अवीव
हमास या दहशतवादी संघटनेला नेस्तनाबूत करण्यासाठी इस्रायलने गाझा पट्टीवर सातत्याने बाँबवर्षाव चालविला असून या हल्ल्यात तेथील किमान 3 हजार इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत, अशी माहिती हमासच्या सूत्रांनी दिली आहे. गेल्या शनिवारपासून सुरु असलेल्या या संघर्षात आतापर्यंत 4 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या भूमीतील इस्रायली नागरिकांमधील मृतांची संख्या 1,200 पेक्षा अधिक आहे. तर इस्रायलमध्ये घुसलेल्या 1,500 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
या संघर्षात आतापर्यंत किमान 120 विदेशी नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. त्यांच्यात आठ पत्रकारांचाही समावेश आहे. हे पत्रकार गेल्या शनिवारी हमासने इस्रायलमध्ये घुसून केलेल्या हल्ल्यात बव्हंशी मृत्यूमुखी पडले आहेत. गाझा पट्टीतही दोन पत्रकारांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. हे पत्रकार युद्धाचे वृत्तांकन करण्यासाठी तेथे गेले होते, असे स्पष्ट करण्यात आले. सैद अल ताविल, मोहम्मद सुब, हिशाम एन नावाची, इब्राहिम लाफी, मोहम्मद करगुन, मोहम्मद एस सलीही, एसाद शेमलाह आणि सेलम माईम अशी मृत्यूमुखी पडलेल्या पत्रकारांची नावे असून निडाल अल् वहिदी आणि हेसेम अब्दुलवहीद हे पत्रकार बेपत्ता आहेत.
लेबेनॉनवरही हल्ले
गाझा पट्टीतून इस्रायलवर होणारा अग्निबाण वर्षाव आता थांबला आहे. मात्र, लेबेनॉनमधील हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेने मंगळवारी इस्रायलवर अग्निबाणांचा वर्षाव केला होता. मात्र, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रत्युत्तरासाठी इस्रायलने लेबेनॉनमधील हिजबुल्ला गटाच्या महत्वाच्या स्थानांवरही विमान हल्ले केले असून त्यात अनेक दहशतवादी ठार झाले आहेत.
लाँचिंग पॅड उद्ध्वस्त
गाझा पट्टीवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हमासची अग्निबाण सोडण्याची लाँचिंग पॅडस् उद्ध्वस्त करण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे. हमासची हल्ला करण्याची क्षमता त्यामुळे अत्यल्प झाली आहे. हमासच्या शस्त्रकोठारांवरही नेम धरुन हल्ले करण्यात येत आहेत. गाझा पट्टीची पूर्ण नाकेबंदी इस्रायलने केली असून हल्ले थांबले नाहीत, तर काही तासात गाझापट्टीचा वीज आणि पाण्याचा पुरवठा नष्ट होऊ शकतो. तसेच तेथे इंधन, अन्न, पाणी आणि वीज यांचा मोठा तुटवडा होऊ शकतो. गाझातील वीजनिर्मिती केंद्रे आता इंधनाअभावी बंद पडण्याचा मार्गावर आहेत, असे संयुक्त राष्ट्रसंघाने स्पष्ट केले आहे.
हमासवर मुस्लीम राष्ट्रांचीही टीका
हमासने इस्रायलवर हल्ला करुन मोठी चूक केली आहे. असा आततायीपणा करावयास नको होता, अशी टीका काही मुस्लीम देशांनीही केली आहे. सिरीयाने या युद्धात पडून ते वाढवू नये, असे आवाहन संयुक्त अरब अमिरातीने केले आहे. सौदी अरेबियानेही उघडपणे हमासची बाजू घेणे टाळले आहे. ईजिप्तने गाझा पट्टीतील शरणार्थींना युद्ध संपेपर्यंत सामावून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ईजिप्तने त्यांना घेतले नाही, तर पळून जाण्यासाठी त्यांना कोणतीही जागा उरणार नाही, असेही गाझातील अनेक संघटनांचे म्हणणे आहे.
अमेरिका साहाय्य करणार
इस्रायलच्या पाठीशी अमेरिका भक्कमपणे उभी असून त्या देशाला आवश्यक ते सर्व युद्धसाहित्य पुरविण्यात येईल, असे अमेरिकेचे विदेश व्यवहार मंत्री अँथोनी ब्लिंकन यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिका सातत्याने इस्रायलच्या संपर्कात आहे. इस्रायलला जर्मनी आणि इतर युरोपियन देशांचेही सक्रीय समर्थन आहे.
चाळीस बालके छिन्नविछिन्न
हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात इस्रायलमधील 40 बालकांना अत्यंत क्रूरपणे मारण्यात आले अशी माहिती इस्रायलने प्रसिद्ध केली आहे. या बालकांचे छिन्नविछिन्न देह सापडले आहेत. हा क्रौर्याचा कळस असून हमासला याची फार मोठी किंमत भोगावी लागेल. आता हमास नष्ट करणे हाच पर्याय आमच्यासमोर उरला आहे, असेही इस्रायलच्या सेना प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.
हल्ले थांबवा, हमासचे आता आवाहन
इस्रायलने गाझा पट्टी उद्ध्वस्त केली असून लोकांसमोर जीवनमरणाचा प्रश्न उभा केला आहे. इस्रायलला हल्ले थांबविण्यास सांगावे, असे आवाहन हमासने केले आहे गेले चार दिवस इस्रायलच्या विमानांनी हमासवर जोरदार बाँबवृष्टी चालविलाr असून त्यामुळे तेथे हाहाकार माजला आहे. असंख्य लोकांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तथापि, हमासने ज्या क्रूरपणे महिलांवर आणि बालकांवर अत्याचार केले ते पाहता त्याला सहानुभूती मिळणे कठीण आहे. आता जे होईल ते त्याला भोगावे लागेल, अशी प्रतिक्रियाही व्यक्त होत आहे.
युद्धाने धरला जोर
ड कोणत्याही क्षणी गाझापट्टीत प्रवेश करण्यासाठी इस्रायलची सज्जता
ड विदेशात गेलेल्या राखीव सैनिकांना विमानाने आणण्याची व्यवस्था
ड हमासच्या बव्हंशी इमारती इस्रायलच्या घनघोर हल्ल्यात धाराशायी









