संग्राम काटकर,कोल्हापूर
महाराष्ट्रातील साडे तीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेले करवीरनगरातील हेमाडपंथी पद्धतीचे अंबाबाई मंदिर साऱ्या देशाला परिचित आहे. मंदिरातील अंबाबाईच्या निवासाने तर करवीरनगरी प्रेरित झाली आहे. किंबहूना करवीर नगरीचा अंबाबाई ही श्वास बनली आहे. तिच्याभोवती संस्थान काळापासून वसलेली बाजारपेठ तर रोजीरोटी झाली आहे. स्थानिकपासून देशातून येणाऱ्या भाविकांच्या झुंडी अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर खरेदीसाठी मंदिराभोवतीच्या बाजारपेठेकडे वळतात हा आता नित्यक्रमच झाला आहे. दागिन्यांच्या गुजरीसह कपडेलत्त्यांची दुकाने असलेला महाद्वार रोड व कोल्हापुरी चप्पल मिळणारी चप्पल लाईन तर खरेदीचे हबच बनली आहे. एकंदरीतच अंबाबाई मंदिरापासून चोहोबाजूच्या 80 मीटरच्या घेरातील या बाजारपेठेत रोज एक ते दीड कोटी याप्रमाणे महिन्याकाठी 400 कोटी ऊपयांची उलाढाल होते.
या उलाढालीतून तब्बल पाच हजारांवर विक्रेत्यांसह विक्रेत्यांकडे कामाला असलेल्या सात ते आठ हजार कामगारांचा चरितार्थ चालत आहे. जीवनावश्यक साहित्यांसह कोल्हापुरी ब्रॅण्ड बनलेला कोल्हापुरी साज व कोल्हापुरी चप्पलमुळे बाजारपेठेला मोठे ग्लॅमर लाभले आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार अंबाबाईच्या दर्शनासाठी रोज 30 ते 35 हजार परगावाचे भाविक येतात. दीवाळीसह अन्य सणांसुदीतील सलग सुट्टयांच्या कालावधीतही अंबाबाईच्या दर्शनास महाराष्ट्रासह देशभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या काही लाखाच्या घरात असते. याच भाविकांची संख्या नवरात्री उत्सव काळात तब्बल 20 लाखांवर जाते. यापैकी कित्येक भाविक गुजरीतील कोल्हापुरी साजासह अंबाबाई मंदिराभोवती वसलेल्या बाजारपेठेतील जीवनावश्यक साहित्य खरेदीला प्राधान्य देतात. त्यामुळेच बाजारपेठेत कोट्यावधीची उलाढाल होते हे वास्तव आहे. साधारणपणे 1920 ते 23 या कालावधीत म्हणजे संस्थान काळात जोतिबा रोड, गुजरी व महाद्वार रोडवर हाताच्या बोटावर मोजण्या इतकी दागिने, साडी, पूजा साहित्य व कपड्यांसह अन्य साहित्य विक्री करणारी दुकाने होती. कालांतराने भाऊसिंगजी रोड, जोतिबा रोड, ताराबाई रोड, गुजरी, सरलष्कर भवन व राजोपाध्ये बोळ आदी भागांचे विस्तारीकरण केले.
या विस्तारीत भागाच्या दुर्तफा नवी दुकाने झाली. या दुकानांमध्ये पुजेच्या साहित्यासह देवीसाठी साड्या, पेढे, ज्वेलरी, बांगड्या, कपडे, गृहपयोगी वस्तू, नारळ, शालेय साहित्य, रांगोळी, पर्स, सौंदर्य प्रसाधने, हारफुले आदी नाना प्रकारचे साहित्य मिळू लागले. पापाची तिकटीला 1950 च्या आसपास वसलेल्या चप्पल लाईनने अंबाबाईसह कोल्हापूरची महती देशाबरोबरच साऱ्या जगात पोहोचवली. तेव्हापासून आजपर्यंत परगावचे भाविकांकडून मोठ्या आवडीने बाजारपेठेतील साहित्यासह कोल्हापूर चप्पल खरेदी करू लागले आहेत. 40 वर्षापूर्वी बाजारपेठेतील दुकानांच्या संगतीला फेरीवाले आल्याने रोड मार्केटींगचा नवा फंडा उदयाला आला. फळेवाल्यांनी तर रस्त्याच्या मधली जागा पकडून बक्कळ कमाईला सुऊवात केली.
रस्ते माल सस्ते मे या उक्तीमुळे दुकानदार आणि फेरीवाले यांच्यात वस्तू व फळांच्या किंमतीवर स्पर्धा सुऊ झाली. ग्राहक वर्ग खरेदीसाठी फेरीवाल्यांकडेही झुकला. जसा काळ पुढे सरकू लागला तशी फेरीवाल्यांनी विस्तार वाढवला. असे चित्र बनत असतानाच फेरीवाल्यांकडून कमी किंमतीत मिळणार माल हा दुय्यम दर्जाचा असल्याचा शिक्का मारला गेला. असे असले तरी याच कमी किंमतीच्या मालाच्या खरेदीने गरीब कुटुंबीयांची मात्र चारपैशाची बचत झाली. सामान्य व पैसेवाले कुटुंबेही दुकानांमधून गरजेचे साहित्य खरेदी करतच राहिल्याने दुकानदारांनाही चार पैसे जादा मिळू लागले.
दळण वळणाची साधने जशी वाढत गेली तशी अंबाबाईच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांची ही वाढू लागली. पहाटे पाच वाजता अंबाबाई मंदिराचे चारही दरवाजे खुले झाले की स्थानिकपासून देशभरातील भाविकांचे पाय अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिराकडे वळतात आणि येथूनच खऱ्या अर्थाने बाजारपेठेतील रोजच्या उलाढालीला सुऊवात होते. भाविकांची गर्दी कॅश करण्यासाठी दुकानदार, फेरीवाले रोज उजाडलेल्या काळापासूनच गजरे, हार, फुलांसह अन्य साहित्यांचा व्यवसाय खुला करत आहे. जशी सकाळ होत जाते तशी बाजारपेठ स्थानिकांसह परगावच्या भाविकांच्या वर्दळीने फुलून जाते. यातून सुऊ होणारा खरेदीचा सिलसिला रात्री उशिरापर्यंत सुऊच राहतो. 30 वर्षांपूर्वी बाजारपेठ खरी कॉर्नर, तटाकडील तालीम, गंगावेश, महापालिका, बिंदू चौक, शिंगोशी मार्केट इथपर्यंत वाढत गेली. वाढत्या बाजारपेठेत पुर्वीच्या तुलनेत नव्या दुकानांसह फेरीवाल्यांची दुप्पटीने पटीने भर पडली. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठेत दाटीवाटीची झाली. या दाटीवाटीतूनच मोक्याच्या जागा पकडून हॉटेल्सही उभारली.
हॉटेल्समध्ये नाश्त्यासह जेवणही मिळू लागल्याने बाजारपेठेतील खरेदीनंतर भाविकवर्ग हॉटेल्सकडे हमखास वळतात. त्यामुळे हॉटेल्सचीही चांदी झाली. एकंदरीत अशा सगळ्या वातावरणात गेल्या दोन दशकांपासून नव्या व जुन्या बाजारपेठेने अनोख्या स्पर्धेचे ऊप धारण केले आहे. लाख विनंत्या कऊन आपल्याकडील पुजेच्या साहित्यासह कपड्यांची खरेदी करण्यासाठी भाविकांना पटवले जाऊ लागले आहे. शिवाय दुकानांमधील मालाप्रमाणेच फेरीवाल्यांकडेही चांगला माल मिळू लागल्याने मधल्या काळात दर्जाच्या बाततीत तयार झालेली दरी आता नाहीशी झाली आहे. लोक पूर्वीसारखे न लाजता दुकानांबरोबरच फेरीवाल्यांकडूनही मनसोक्त खरेदी करत आहेत. यामध्ये घरची परिस्थिती बेताची असलेल्या आणि चांगले शिक्षण घेऊनही नोकरी न मिळालेल्या तऊणांची संख्या जादा झाली आहे. त्यांच्याकडील मालाची खरेदी केली जाऊ लागल्याने फेरीवाल्यांची आर्थिक परिस्थिती आणखी सुधारली. राहणीमानातही अमुलाग्र बदल झाला. आई अंबाबाईचा आशिर्वादाने हे घडल्याचे सर्व दुकानदार व फेरीवाले अगदी मनापासून सांगताहेत.
अंबाबाई मंदिराभोवतीच्या बाजारपेठेतील विक्रेत्यांची संख्या अशी
दुकानदार : 2400
फेरीवाले : 668
ज्वेलरी दुकाने : 1200
फुल विक्रेते : 154
चप्पल विक्रेते : 142
लहान मोठी हॉटेल्स व खाद्य पदार्थ विक्रेते : 54
हारवाले : 39
मुलांची लग्ने केली…घर बांधले…
केर्ली (ता. करवीर) येथील फेरिवाले विलास खडके हे गेली 37 वर्षे महाद्वार रोडवर कपडे विकण्याचा व्यवसाय करत आहेत. ते सांगतात की अंबाबाईच्या दर्शनाच्यानिमित्ताने स्थानिकांसह परगावाहून येणारा ग्राहक विनासंकोच बाजारपेठेतील विविध साहित्य फेरीवाल्यांकडूनही खरेदी करत आहे. त्यामुळे फेरीवाल्यांच्या घरची आर्थिक स्थितीत सुधारली आहे. या सुधारलेल्या परिस्थितीमुळेच फेरिवाले मुलांच्या शिक्षणासह त्यांची लग्ने कऊ शकले आहे. चांगल्या पद्धतीची घरे ही बांधू शकले आहे.
तिसरी-चौथी पिढी सांभाळते दुकानांचा व्यवहार
इसवी सन पूर्वी पंचगंगा नदीच्या काठावर जसे ब्रह्मपुरीच्या ऊपाने कोल्हापूर वसले गेले तसे संस्थान काळापासून अंबाबई मंदिराभोवतीने बाजारपेठ वसत गेली. या बाजारपेठेने आता विशाल ऊप धारण केले आहे. शिवाय बाजारपेठेतील दुकानदारांची सध्या तिसरी-चौथी पिढी दुकानांमधील व्यवहार सांभाळत आहे. आई अंबाबाईच्या दर्शनाच्यानिमित्ताने येणारे परगावचे भाविक मोठ्या विश्वासाने बाजारपेठेतून जे जे हवे ते ते खरेदी करत आहेत. यातून होणारी कमाईच्या जोरावर दुकानदांची कुटुंबे चांगले जीवन जगत आहे.
अनिल वनारसे (1925 साली जोतिबा रोडवर स्थापलेल्या सूर्यप्रभा स्टोअर्सचे मालक)
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









