दोन अफगाणींसह चौघांना अटक ः 30 लाखांची रोकडही हस्तगत
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) पथकाने बुधवारी रात्री दिल्लीच्या शाहीन बाग परिसरातून अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. एनसीबीच्या पथकाने 50 किलो हेरॉईन, 30 लाख रुपये रोख आणि 47 किलो इतर मादक द्रव्ये जप्त केली आहेत. जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत सुमारे 400 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी एनसीबीच्या अधिकाऱयांनी कारवाईसंबंधी सविस्तर माहिती दिली. या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी गुरुवारी अटक केली, तर अन्य तिघांना शुक्रवारी अटक करण्यात आली. अटक झालेल्यांमध्ये दोन अफगाणिस्तानी नागरिकांचाही समावेश आहे. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा भारत-अफगाण सिंडिकेटशी संबंध जोडून तपास करत आहेत. हेरॉईनचा साठा अफगाणिस्तानातून सीमेवरून भारतात आणण्यात आला असून रोकड हवाला मार्गे भारतात पोहोचल्याचा संशय एनसीबीला आहे.
एका गुप्त मोहिमेअंतर्गत दिल्लीतील शाहीन बाग आणि जामिया परिसरात असलेल्या एका घरावर छापा टाकण्यात आला. तेथून 50 किलो हेरॉईन आणि 47 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. यासोबतच 30 लाखांची रोकड आणि नोटा मोजण्याचे मशीनही जप्त करण्यात आली अशी माहिती एनसीबीचे उपमहासंचालक (डीडीजी) ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली. जप्त केलेले अमली पदार्थ फ्लिपकार्टच्या पॅकिंगमध्ये सापडले आहेत. दिल्लीतील कोणत्याही दाट लोकवस्तीच्या भागात झालेली ही सर्वात मोठी जप्तीची कारवाई आहे. जप्त केलेल्या सर्व वस्तू प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.









