ओटवणे प्रतिनिधी
तीन लाख रुपयांचे नुकसान
काजूच्या बागेला अचानक आग लागून सुमारे ४०० काजूची कलमे भस्मसात झाल्याची घटना फणसवडे गावात काजीचा पाचा येथे घडली. आठ वर्षाची संपूर्ण काजूची बागायतच या घटनेत भस्मसात झाल्याने सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.फणसवडे येथील प्रसिध्द छायाचित्रकार तथा युवा प्रगतशिल बागायतदार प्रभाकर शंकर गावडे यांची काजू कलमे असलेली ही बाग आहे. गेली सात आठ वर्षे काबाडकष्ट करून गावडे कुटुंबियांनी ही बाग साकारली होती. त्यामुळे काजू ही बाग बहरलेली होती. दरम्यान या बागेला आग लागल्याचे समजताच गावडे कुटुंबियांसह शेजाऱ्यांनी तात्काळ धाव घेतली. मात्र आगिने रौद्ररूप धारण केल्यामुळे बागायती मधील सर्व काजूची सुमारे ४०० कलमे या अग्निप्रलयात भस्मसात झाली. मात्र या आगीत गावडे कुटुंबियांचे सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. बागायती बहरलेली असतानाच पूर्ण बागायती आगीत भस्म झाल्याने गावडे कुटुंबीयांना धक्काच बसला आहे. दरम्यान आगीचे कारण समजू शकले नाही. दरम्यान कृषी पर्यवेक्षक वाय सी सावंत, ग्रामसेवक सी. ए. शेडगे, कृषी सहाय्यक श्री टोटावडे यानी घटनास्थळी भेट दिली आणि पंचनामा केला.








