परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता : नियोजनाचा अभाव, पावसाच्या प्रतीक्षेत सारेच
प्रतिनिधी/ बेळगाव
पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण होत आहे. याचबरोबर ग्रामीण भागासह शहराला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शहरातील 40 वॉर्डांना तर जिल्ह्यातील 82 गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
बेळगाव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. बेळगाव व खानापूर तालुकेही याला अपवाद नाहीत. बेळगाव तालुक्मयातही काही गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तब्बल आठवड्यातून एकदा केला जात आहे. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शुद्ध पाणी पुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. पाणीटंचाई दूर करण्यासाठी सरकारने मोठा निधी उपलब्ध केला आहे. पण जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून पाण्यासाठी कोणत्याच ठोस अशा योजना राबविण्यात आल्या नाहीत. जलजीवन मिशन योजनेंतर्गत अनेक गावांमध्ये योजना राबविली तरी ती योजना कुचकामी ठरली आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये पाण्याची गंभीर समस्या बनली आहे.
जिल्ह्यातील बऱ्याच गावांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जुलै महिन्याला सुरुवात झाली आहे. मात्र म्हणावा तसा पाऊस अद्यापही झाला नाही. पावसाचा केवळ शिडकावा होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. काही गावात तर बऱ्याच दिवसांनंतर नळाला पाणी आले. जिल्ह्यातील रामदुर्ग, गोकाक, मुडलगी, चिकोडी, रायबाग, अथणी, निपाणी या तालुक्यांमध्ये पाण्याची समस्या गंभीर बनली असून त्या सर्व तालुक्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अनेक गावांमध्ये दरवर्षीच पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. मात्र या समस्यांकडे प्रशासन का लक्ष देत नाही? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. राकसकोप जलाशयानेही तळ गाठला असून डेडस्टॉकमधील पाणी उपसा करून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान बेळगाव शहरातही 40 वॉर्डांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
जिल्ह्यात विविध योजनांतर्गत कूपनलिका खोदाईचे काम सुरू आहे. कूपनलिका अनेक ठिकाणी बंद आहेत. त्यांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करणे गरजेचे होते. मात्र अनेक कूपनलिकांची दुरुस्तीच करण्यात आली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस ग्रामीण भागातील पाण्याची समस्या बिकट होत चालली आहे. कूपनलिकांना पाणीच उपलब्ध होणे कठीण झाले आहे. कारण भूजलपातळी किती खालावली आहे, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरजही निर्माण झाली आहे.
गोकाक, अथणी, रायबाग, हुक्केरी, सौंदत्ती, रामदुर्ग आणि चिकोडी तालुक्यातील अनेक गावांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. या गावांना कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा या नद्यांमधून पाणी सोडून पाण्याची समस्या सोडविली जाते. याचबरोबर टँकरनेही पाणीपुरवठा केला जातो. पण बेळगाव तालुक्यात अशाप्रकारे मोठी नदी नसल्याने नेहमीच पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यावर्षी या तालुक्यांमधील गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली नाही, असे अधिकारी सांगत आहेत. मात्र अनेकांना पायपीठ करून पाणी आणावे लागत आहे. दरम्यान याबाबत गांभीर्याने विचार करून पाण्याच्या नियोजनाची गरज व्यक्त होत आहे.









