आफ्रिकन किनाऱ्याजवळ दुर्घटना
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळ एक प्रवासी बोट उलटल्याने झालेल्या दुर्घटनेत 40 हून अधिक पाकिस्तानी नागरिक बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. ही घटना पश्चिम सहाराच्या वादग्रस्त प्रदेशात असलेल्या दखला या मोरोक्कन बंदराजवळ घडली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले. दुर्घटनेवेळी सदर बोटीवर एकूण 86 लोक होते. हे लोक स्पेनला जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांची बोट बुडाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. बोट उलटल्यानंतर काही पाकिस्तानी नागरिकांसह 46 प्रवाशांना वाचवण्यात आले.
पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने गुरुवारी रात्री एका निवेदनात मोरोक्कोमधील त्यांचे दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट केले. परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी संबंधित सरकारी संस्थांना प्रभावित पाकिस्तानी नागरिकांना सर्व शक्य सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या घटनेचा अहवाल अधिकाऱ्यांकडून मागवतानाच स्थलांतरितांच्या या घृणास्पद कृत्यात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.









