सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी
बेळगाव : सदाशिवनगर येथील स्मशानभूमीतील अंत्यविधी करण्यात येणारे शेड पूर्णपणे खराब झाले होते. याबाबत नगरसेवक शिवाजी मंडोळकर, नगरसेविका वैशाली भातकांडे आणि नगरसेवक रवी साळुंखे यांनी महापालिकेच्या सभागृहामध्ये त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत या स्मशानभूमीमध्ये नव्याने शेड उभारण्यासाठी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सध्या शेड हटविण्यात येत आहे. त्यानंतर त्या ठिकाणी नव्यानेच शेड उभे करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी हा निर्णय घेण्यात आला आहे. अध्यक्षा वाणी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. त्यावेळी सदाशिवनगर येथील स्मशानभूमीचा विषय आला. त्यावर अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी 40 लाख रुपये खर्च येणार असून त्याबाबत मंजुरी द्यावी, अशी मागणी केली. सर्वच नगरसेवकांनी त्याला मंजुरी दिली.
यावेळी सदाशिवनगर बरोबरच अनगोळ, शहापूर, वडगाव व इतर स्मशानभूमीसाठीही निधीची तरतूद करावी, अशी मागणी काही नगरसेवकांनी केली. त्यावर निश्चितच तरतूद केली जाईल, असे सांगण्यात आले. सदाशिवनगर येथील स्मशानभूमीमध्ये नव्यानेच हे शेड उभे करण्यात येणार आहे. त्याची उंचीही अधिक केली जाणार असल्याचे अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी सांगितले. याचबरोबर वडगाव, शहापूर येथील स्मशानभूमीमधील दुरुस्तीसाठीही निधीची तरतूद केली जाईल, असे त्यांनी सांगितले. सदाशिवनगर येथील स्मशानभूमीमधील शेड खराब झाले होते. शेडवरील पत्रे जीर्ण झाल्याने कधी कोसळतील याची शाश्वती नव्हती. याबाबत शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे यांनी छायाचित्रासह माहिती दिली होती. त्यानंतर त्याची दखल घेऊन आता 40 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सध्या असलेले शेड हटविण्याचे कामही सुरू झाले आहे.









