गणेशोत्सव काळात ४० किलो निर्माल्य आणि ३५ किलो प्लास्टिक केले गोळा
आचरा | प्रतिनिधी
गणेशोत्सव काळात निर्माल्य आणि प्लास्टिक कचरा ही एक मोठी समस्या बनते. यामुळे पर्यावरणाची हानी होतेच. हीच बाब लक्षात घेत चिंदर सडेवाडी परिसरातील पर्यावरणप्रेमी ग्रामस्थांनी धार्मिक सण साजरे करत असताना पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद ठरला. गणेशोत्सव काळातील अकरा दिवसात सुमारे ४० किलो निर्माल्य आणि ३५ किलो प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करून पर्यावरणाप्रति बांधिलकी जपली.मालवण तालुक्यातील चिंदर सडेवाडी गावामधील गोसावीवाडी, देवकोंडवाडी, घागरे-मुळयेवाडी या परिसरातील ग्रामस्थांनी यंदाच्या गणेशोत्सव काळात शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाला खऱ्या अर्थाने बळ दिले. गणेशोत्सव काळात निर्माण होणारे निर्माल्य आणि प्लास्टिक कचरा ही एक मोठी समस्या बनते. अनेक ठिकाणी हा कचरा थेट नदी, तलाव किंवा समुद्रात फेकला जातो, ज्यामुळे जलप्रदूषण वाढते. मात्र, या तीनही वाड्यांच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन या समस्येवर निर्माल्य आणि प्लास्टिक संकलनाचा एक आदर्श उपाय शोधला. माझी वसुंधरा अभियानाची चळवळ अधिक व्यापक होण्यासाठी ग्रामस्थांचा विश्वास संपादन करण्यात आला. या अभियानात पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी माणसे जोडली गेली. नाथगोसावी फळेभाजीपाला संस्थेच्यावतीने घरोघरी प्रत्येकी दोन पिशव्या देण्यात आल्या. त्यातून निर्माल्य आणि प्लास्टिक संकलन करण्यात आले. जमा झालेले निर्माल्य नैसर्गिक खत निर्मितीसाठी वापरले जाणार आहे. तसेच जमा झालेले प्लास्टिक योग्य पद्धतीने पुनर्वापर करण्यासाठी पाठवले जाणार आहे.चिंदरमधील तीन वाड्यांमधील सुमारे २९ गणपतीच्या मुर्त्या या शाडू मातीमध्ये साकारण्यात आल्या होत्या. याबाबत लोकांना विश्वासात घेऊन गणेश मुर्त्या शाडू मातीच्याच असाव्यात असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. याला ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही पर्यावरणाची हानी करणार नाही, असा संदेश देत माझी वसुंधरा’ अभियानाची खरी उद्दिष्ट्ये पूर्ण केली आहेत. ग्रामस्थांनी घेतलेल्या पर्यावरणवादी पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. चिंदर ग्रामस्थांनी केलेल्या कृतीचे अनुकरण सर्व गावांमध्ये केले गेल्यास आपली सुजलाम सुफलाम वसुंधरा वाचवू शकतो, असाही संदेश या अभियानातून देण्यात आला.









