इचलकरंजी / प्रतिनिधी
शहराच्या भरवस्तीत असलेल्या बालाजी चौकातील एका इलेक्ट्रिक दुचाकी गाड्याच्या गोडावूनला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत 40 इलेक्ट्रिक दुचाकी गाड्या जळून भस्मसात झाल्याने 40 लाखाहून अधिक रुपयाचे नुकसान झाले आहे.
बालाजी चौकाशेजारी ‘रॉयल ई’ या नावाचे इलेक्ट्रिक दुचाकी गाड्या विक्रीचे शोरुम आहे. या शोरुमलगत इलेक्ट्रिक दुचाकी गाड्याचे गोडावून आहे. गोडावनमध्ये विक्रीसाठी आणलेल्या 40 इलेक्ट्रिक दुचाकी गाड्या ठेवण्यात आल्या होत्या. अशा दुचाकीच्या गोडावूनला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केल्याने, आगीने संपूर्ण गोडावूनला कवेत घेतले. या आगीची माहिती समजताच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन पाण्याचे बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानानी त्वरीत आगीवर नियंत्रण मिळवत आग विझवली. पण या आगीत 40 इलेक्ट्रिक दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या.