दहा लाखाचा खर्च अपेक्षित, हेस्कॉमकडून कामाला सुरवात
खानापूर : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जनाच्या मार्गावरील विद्युत वाहिनांचा अडथळा निर्माण होत होता. याची खानापूर हेस्कॉमचे अधिकारी जगदीश मोहीतेश व विभागीय अधिकारी भरतेश नागनूर यांनी गणपती महामंडळाच्या पदाधिकारीसंमवेत पाहणी करुन अडथळा निर्माण करणाऱ्या खांबांची तातडीने बदली करून विद्युतवाहिन्या उंचावर घालण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरवात केली आहे. याबद्दल गणेश महामंडळाकडून हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. शहरात गणपती विसर्जनाच्या मार्गावर ठिकठिकाणी विद्युतवाहिन्या खालून जात असल्याने तसेच काही ठिकाणी विद्युतवाहिन्या खाली लेंबकळत असल्याने गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता.
काहीवेळा गणपतीच्या तसेच इतर मिरवणुकीच्यावेळी या विद्युतवाहिन्यामुळे मिरवणुकीला अडथळा होत होता. तसेच विद्युतवाहिन्यामुळे अनेकवेळा विद्युतपुरवठा खंडित होत होता. त्यामुळे महामंडळाच्या पदाधिकाऱ्यानी हेस्कॉमच्या अधिकाऱ्याना लेखी निवेदन देऊन विद्युतवाहिन्या उंच करण्यासंदर्भात तसेच काही ठिकाणी खांब बदलण्याची मागणी केली होती. याची दखल घेत अधिकाऱ्यांनी आराखडा तयार केला असून यासाठी दहा लाखाची तरतूद करून शहरातील गणपती विसर्जनाच्या मार्गावरील 40 विद्युतखांबे बदलून नव्याने घालून विद्युतवाहिन्या उंच करण्याचे काम हाती घेतले आहे. गणपती सण तोंडावर आल्याने शहरातील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून विद्युत खांब घालण्याचे काम हेस्कॉमने रात्रीच्यावेळी करण्यात येत आहे.
नागरिकांनी सहकार्य करावे
येत्या दोन दिवसात शहरातील विद्युतवाहिन्या उंच करण्याचे काम हाती घेण्यात येणार असून शहरातील काही भागातील विद्युतपुरवठा खंडित होणार आहे. याबाबत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन हेस्कॉमचे अधिकारी जगदीश मोहीते यांनी केले आहे.









