प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहर व परिसरात घरफोडय़ा वाढल्याने नागरिक हैराण झाले असताना सातारा व उपनगरात तब्बल 40 घरफोडय़ा करणारा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करण्याची कामगिरी केली. त्याच्याकडून सोन्याचे चांदीच्या दागिन्यासह लॅपटॉप, किंमती घडय़ाळे, कॅमेरे असा एकूण 20 लाख 20 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळाले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. विजय सत्ताप्पा ढोणे (वय 29 मूळ रा. बिदर कर्नाटक, सध्या रा. देगाव फाटा, सातारा) असे अटक केलेल्या अट्टल चोरटय़ाचे नाव आहे.
सातारा स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेस अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्यासह कारवाई पथकातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
एसपी सातपुते यांनी सांगितले की, सातारा शहर परिसरात घरफोडय़ाचे गुन्हे वाढले असल्याने या चोऱया उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील व उपनिरीक्षक प्रसन्न जऱहाड यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले होत. या पथकाला दि. 21 रोजी पेट्रोलिंग करत असताना स्विगी खाद्यपदार्थांची डिलिव्हरी करणारा एक संशयित शाहूनगर परिसरात संशयितरित्या फिरताना आढळून आला.
उपनिरीक्षक प्रसन्न जऱहाड व पथकातील कर्मचाऱयांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेवून त्याच्याकडे विचारपूस सुरु केल्यावर त्याने प्रथम उडवाउडवी केली. मात्र नंतर या डिलिव्हरी बॉयने एमआयडीसीतील लक्ष्मीनगरमध्ये रात्रीच्या वेळी घरफोडी केल्याची कबुली दिल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले होते. तपास सुरु झाल्यावर पोलिसांचेही डोके चक्रावून जाईल एवढय़ा घरफोडी या डिलिव्हरी बॉयने केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
त्यामध्ये त्याने सातारा शहरात 40 घरफोडय़ा केल्या असल्याचे सांगितल्यानंतर तपास यंत्रणा सतर्क झाली. त्याच्याकडून कबूल केलेल्या घरफोडय़ाच्या गुन्हय़ापैकी 19 घरफोडय़ांची सातारा व शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद असून त्या चोऱयातील लाखो रुपयांचा मुद्देमाल एलसीबीच्या पथकाने हस्तगत करण्यात यश मिळवले असल्याचे सातपुते यांनी सांगितले. दरम्यान, उर्वरित 21 गुन्हय़ांबाबत त्याच्याकडून माहिती घेण्याचे काम सुरु असून ज्या नागरिकांनी चोरी झाल्याची तक्रारच केली नाही अशा नागरिकांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सातपुते यांनी यावेळी केले.









