वृत्तसंस्था/ माउंट मौनगानुई
स्टुअर्ट ब्रॉडने शनिवारी पहिल्या दिवस-रात्र क्रिकेट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भेदक गोलंदाजी करत अर्धा संघ बाद केल्याने न्यूझीलंड पराभवाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला असून इंग्लंडला 11 कसोटी सामन्यांमधील 10 वा विजय नोंदविण्यासाठी आणखी पाच बळी आवश्यक आहेत.
त्यापूर्वी ज्यो रूट, हॅरी ब्रूक आणि बेन फोक्स यांनी झळकावलेल्या जलद अर्धशतकांमुळे इंग्लंडने दुसऱ्या डावात षटकामागे पाच धावांपेक्षा जास्त वेगाने 374 धावा काढत एकूण 393 धावांची आघाडी मिळविली. त्यांना ऑली पोप, बेन स्टोक्स आणि ऑली रॉबिन्सन यांचीही महत्त्वाची साथ लाभली.
त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉडने डेव्हन कॉनवे (12), केन विल्यमसन (0), टॉम लॅथम (15) आणि पहिल्या डावात शतक करणारा टॉम ब्लंडेल (1) यांना त्रिफळाचीत करून न्यूझीलंडच्या डावाचा भक्क्मपणे पाया घालू शकणाऱ्या फलंदाजांना परत पाठवले. जेव्हा ब्लंडेल बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची स्थिती 5 बाद 28 अशी होती आणि ती खेळ संपेपर्यंत 5 बाद 63 अशी किंचित सुधारली. तरीही न्यूझीलंड 330 धावांनी मागे आहे. त्यांच्या डेरिल मिशेल आणि मायकेल ब्रेसवेल यांनी दिवसाची शेवटची षटके खेळून काढली.
इंग्लंडचा पहिला डाव 9 बाद 325 वर घोषित करण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी ब्लंडेलच्या शतकाच्या साहाय्याने न्यूझीलंडने चांगली मजल मारली होती आणि केवळ 19 धावांनी ते पिछाडीवर पडले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 बाद 79 अशी मजल मारली तेव्हाच इंग्लंडने न्यूझीलंडचा आत्मविश्वास खालावण्यास सुऊवात केली होती. पोप, रूट आणि ब्रूक यांनी शनिवारी पहिल्या सत्रातच इंग्लंडला 158 धावा काढण्यास मदत केली तेव्हा सामना झपाट्याने न्यूझीलंडच्या हातून सुटत आहे हे स्पष्ट होऊ लागले होते.
चौथ्या दिवशी न्यूझीलंडकडून जोरदार लढत दिली जाण्याची आशा ब्रॉडने चौथ्या षटकात कॉनवेचा त्रिफळा उडविल्यानंतर धूसर होत गेली. त्यानंतर विल्यमसन आणि लॅथम हे 18 चेंडूंच्या अंतराने परतले, तर निकोल्सचा रॉबिन्सनच्या चेंडूवर फोक्सने झेल घेतला आणि ब्लंडेलला ब्रॉडने बाद केले.
संक्षिप्त धावसंख्या : इंग्लंड दुसरा डाव 374 (ऑली पोप 49, ज्यो रूट 57, हॅरी ब्रूक 54, बेन फोक्स 51, बेन स्टोक्स 31, ऑली रॉबिन्सन 39, वॅगनर 2-110, टिकनर 3-55, स्कॉट कुगलेजिन 2-81, ब्रेसवेल 3-68), न्यूझीलंड दुसरा डाव 5 बाद 63 (लॅथम 15, कॉनवे 2, विल्यमसन 0, निकोल्स 7, मिशेल नाबाद 13, ब्लंडेल 1, ब्रेसवेल 25, ब्रॉड 4-21, रॉबिन्सन 1-34)
ब्रॉड-अँडरसन जोडीने मॅकग्रा-वॉर्नला टाकले मागे
दरम्यान, ब्रॉडने चार बळी घेतल्याने त्याच्या व जेम्स अँडरसनच्या मिळून कसोटी बळींची संख्या 1004 वर गेली आहे. त्यांनी ग्लेन मॅकग्रा आणि शेन वॉर्न (1001 बळी) या ऑस्ट्रेलियन जोडीला मागे टाकले आहे. यापूर्वी कसोटीत ती सर्वाधिक बळी घेणारी जोडी होती.









