पहिल्या वनडे सामन्यात विंडीजवर 5 गड्यांनी भारताचा विजय, इशान किशनचे शानदार अर्धशतक, जडेजाचे 3 बळी, विंडीजचा 114 धावांत धुव्वा
वृत्तसंस्था /ब्रिजटाऊन
सामनावीर कुलदीप यादव व रवींद्र जडेजा यांची भेदक गोलंदाजी आणि इशान किशनचे शानदार अर्धशतक यांच्या बळावर भारताने येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात यजमान विंडीजचा 5 गड्यांनी पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली प्रथम फलंदाजी मिळाल्यावर विंडीजचा केवळ 23 षटकात 114 धावात खुर्दा उडाला. कर्णधार शाय होप, अॅलिस अॅथनेझ, ब्र्रँडन किंग व हेटमायर या चौघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. त्यानंतर विंडीजच्या मोती व कॅरिया यांनीही भेदक फिरकी मारा करीत भारतावर दडपण आणले होते. पण इशानने अर्धशतकी खेळी करीत संघाचा विजय निश्चित केला. या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी याच ठिकाणी होणार आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. भारतीय संघातील गोलंदाज हार्दिक पंड्या, मुकेशकुमार, शार्दुल ठाकुर यांनी नव्या चेंडूवर विंडीजच्या फलंदाजांना जखडून ठेवले होते. हार्दिक पंड्याने डावातील तिसऱ्या षटकात मेयर्सला 2 धावावर शर्माकरवी बाद केले. त्यानंतर किंग आणि अॅथनेझ यांनी दुसऱ्या गड्यासाठी 38 धावांची भागीदारी केली. वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मुकेशकुमारने अॅथनेझला जडेजाकरवी झेलबाद केले. त्याने 18 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 22 धावा जमवल्या तर शार्दुल ठाकुरने किंगचा त्रिफळा उडवला. त्याने 23 चेंडूत 3 चौकारांसह 17 धावा केल्या. विंडीजने पॉवर प्लेच्या 10 षटकात 3 गडी गमावताना 52 धावा जमवल्या. विंडीजचे अर्धशतक 58 चेंडूत फलकावर लागले.
कर्णधार शर्माने जडेजा आणि कुलदीप यादव यांच्याकडे चेंडू सोपवल्यानंतर विंडीजच्या फलंदाजांना धावा जमवणे कठीण झाले. ते ठराविक अंतराने बाद झाले. याला केवळ कर्णधार शाय होप अपवाद म्हणावा लागेल. होपने 45 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 43 धावा जमवत तो नवव्या गड्याच्या रुपात बाद झाला. जडेजाने हेटमायरचा त्रिफळा उडवला. त्याने 1 चौकारांसह 11 धावा केल्या. विंडीजच्या शेवटच्या पाच फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. विंडीजचे शतक 114 चेंडूत फलकावर लागले. पॉवेलने 4, ड्रेक्स आणि कॅरे यांनी प्रत्येकी 3 धावा जमवल्या. शेफर्ड आणि सिलेस यांना आपले खातेही उघडता आले नाही. 23 षटकात विंडीजचा 114 धावात खुर्दा झाला. त्यांच्या डावात 2 षटकार आणि 12 चौकार नोंदवले गेले. भारतातर्फे कुलदीप यादवने आपल्या 3 षटकात 6 धावांच्या मोबदल्यात 4 गडी बाद केले. जडेजाने 37 धावांत तीन बळी मिळवले. हार्दिक पंड्या, मुकेशकुमार आणि शार्दुल ठाकुर यांनी प्रत्येकी एक बळी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना चौथ्या षटकात सलामीचा फलंदाज गिल सील्सच्या गोलंदाजीवर किंगकरवी झेलबाद झाला. त्याने 16 चेंडूत 1 चौकारांसह 7 धावा जमवल्या. एका बाजूने इशान किशन सावध फलंदाजी करत होता. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या सूर्यकुमार यादवने 25 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 19 धावा जमवल्या. डावातील 11 व्या षटकात मोतीने त्याला पायचीत केले. इशान किशन अर्धशतक झाल्यानंतर बाद झाला.
संक्षिप्त धावफलक
विंडीज 23 षटकात सर्वबाद 114 (किंग 3 चौकारांसह 17, अॅथनेझ 1 षटकार, 3 चौकारांसह 22, होप 1 षटकार, 4 चौकारांसह 43, हेटमायर 11, अवांतर 9, यादव 4-6, जडेजा 3-37, पंड्या 1-17, मुकेशकुमार 1-22, ठाकुर 1-14).
भारत 22.5 षटकांत 5 बाद 118 : इशान किशन 46 चेंडूत 52, गिल 7, सूर्यकुमार यादव 25 चेंडूत 19, हार्दिक 5, शार्दुल ठाकुर 1, जडेजा नाबाद 16, रोहित शर्मा नाबाद 12, अवांतर 6. गोलंदाजी : जेडेन सील्स, गुडाकेश मोती 2-26, यानिक कॅरिया 1-35.









