शोधमोहिमेसाठी झाला ड्रोनचा वापर
वृत्तसंस्था / पुंछ
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. पुंछच्या सिंधरा भागात सुरक्षा दलांनी संयुक्त मोहिमेत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. सुरक्षा दलांसोबत दहशतवाद्यांची पहिली चकमक सोमवारी रात्री सुमारे 11.30 वाजता झाली होती, ज्यानंतर टेहळणीसाठी ड्रोन तैनात करण्यात आले होते.
मंगळवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला आहे. भारतीय सैन्याचे विशेष पथक, राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत अन्य सुरक्षा दलांनी या मोहिमेत भाग घेतला होता. या चकमकीत विदेशी दहशतवादी मारले गेले असून त्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचबरोबर पुंछच्या सूरनकोटमध्ये देखील दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे.
नियंत्रण रेषेपलिकडून आयएसआय आणि दहशतवादी संघटनाच्या म्होरक्यांकडून भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या आसपास मोठा हल्ला घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. याकरता दहशतवाद्यांना घुसखोरी करण्याचे निर्देश आयएसआयकडून देण्यात आले आहेत. यापूर्वी चक्कां दा बागमध्ये 25 जून रोजी सुरक्षा दलांनी घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.









