मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त
► वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. कुपवाडामध्ये भारतीय लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत शुक्रवारी चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असताना चकमक झडल्याचे सुरक्षा सूत्रांकडून सांगण्यात आले. या कारवाईनंतर घटनास्थळावरून मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जम्मू-काश्मीर दौऱ्यावर असतानाच हा घुसखोरीचा प्रयत्न उधळण्यात आला आहे.
कुपवाडामध्ये झालेल्या चकमकीनंतर नियंत्रण रेषेवरील सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनंतर भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी कुपवाडा परिसरात शोधमोहीम सुरू केली होती. या शोध मोहिमेदरम्यान पोलिसांना 4 दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधून कुपवाडा जिह्यात घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले. सुरुवातीला या दहशतवाद्यांना शरणागती पत्करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, त्यांनी गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलाने त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. यापूर्वी 16 जून रोजी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिह्यातच झालेल्या चकमकीत 5 दहशतवादी मारले गेले होते.









