वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये दोन प्रतिबंधित संघटनांशी संबंधित चार दहशतवाद्यांना शस्त्रास्त्र बाळगणे आणि खंडणीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला कांगलीपाक कम्युनिस्ट पार्टी (पीपल्स वॉर ग्रुप) संघटनेशी संबंधित तीन दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे बाळगणे आणि लोकांकडून खंडणी उकळण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. चोंगथम श्यामचंद्र सिंग (23, रा. इंफाळ पश्चिम), मैबाम सूरज खान (32) आणि बोघिमयम साहिद खान (30, रा. इंफाळ पूर्व) अशी त्यांची नावे आहेत. दुसऱ्या कारवाईत बंदी घातलेल्या युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटच्या (निंगोन माचा गट) एका दहशतवाद्याला बेकायदेशीर शस्त्रs बाळगल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. संगोमशामफाम वारीश (25) असे त्याचे नाव असून तो थौबल जिह्यातील लिलोंग हाओरू येथील रहिवासी आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.









