बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ घोषित, मर्फी नवा चेहरा
वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलियाने भारतात होणाऱया बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेसाठी 18 सदस्यीय संघाची घोषणा केली असून त्यात चार स्पिनर्स व सहा जलद गोलंदाजांचा समावेश केला आहे. नवोदित ऑफस्पिनर टॉड मर्फीला या संघात प्रथमच स्थान मिळाले आहे. 9 फेब्रुवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे.
2004 नंतर भारतात पहिली कसोटी मालिका जिंकण्याची आशा करणाऱया ऑस्ट्रेलियाने फिरकी गोलंदाजांवर जास्त भरवसा दाखवला आहे. यातील सामने नागपूर (9-13 फेब्रुवारी), नवी दिल्ली (17-21 फेबुवारी), धरमशाला (1-5 मार्च), अहमदाबाद (9-13 मार्च) येथे खेळविले जातील.
व्हिक्टोरियाच्या 22 वर्षीय मर्फीसमवेत ऍश्टन ऍगर, मिशेल स्वेप्सन व अनुभवी नाथन लियॉन हे फिरकीची बाजू सांभाळतील. बॅटिंग बॅकअप म्हणून पीटर हँड्सकॉम्ब व मॅथ्यू रेनशॉ यांनाही निवडण्यात आले आहे. मात्र मार्कस हॅरिसला या संघातून वगळण्यात आले आहे. मिशेल स्टार्कला बोटाची दुखापत झाली असल्याने त्याला नागपूरची पहिली कसोटी हुकणार असून उर्वरित कसोटींसाठी तो कर्णधार पॅट कमिन्स, जोश हॅझलवुड, स्कॉट बोलँड, लान्स मॉरिस यांच्यासमवेत संघात असेल. कॅमेरॉन ग्रीनच्या बोटालाही प्रॅक्चर झाले असून या मालिकेत त्याचा समावेश करण्यात आला आहे. या दुखापतीतून लवकर बरे होण्यासाठी तो प्रयत्न करीत आहे, असे माजी कर्णधार व विद्यमान निवड समिती प्रमुख जॉर्ज बेली यांनी सांगितले.
स्थानिक क्रिकेटमध्ये मर्फीने चमकदार प्रदर्शन केल्याने त्याची निवड करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मर्फीने 7 प्रथमश्रेणी सामन्यात 29 बळी मिळविले असून 14 लिस्ट ए व आठ टी-20 सामनेही त्याने खेळले आहेत. हँड्सकॉम्बने 2019 मध्ये शेवटची कसोटी खेळली होती. या मालिकेनंतर तीन सामन्यांची वनडे मालिकाही ऑस्ट्रेलिया संघ खेळणार असून त्याचा संघ नंतर निवडण्यात येणार आहे.
भारत दौऱयासाठी ऑस्ट्रेलिया संघ ः पॅट कमिन्स (कर्णधार), ऍश्टन ऍगर, स्कॉट बोलँड. ऍलेक्स कॅरे, ग्रीन, हॅझलवुड, हँड्सकॉम्ब, टॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, लाबुशेन, लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, स्वेप्सन, डेव्हिड वॉर्नर.









