मृतांचा आकडा वाढण्याची भीती : बलुचिस्तानात हल्ला
वृत्तसंस्था/ पेशावर
पाकिस्तानच्या बलुचिस्तानात रविवारी एका दहशतवादी हल्ल्यात अनेक सैनिक मारले गेल्याचे वृत्त आहे. 4 सैनिकांच्या मृत्यूची पुष्टी सध्या झाली आहे. या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने स्वीकारली आहे. चालू वर्षात बलुचिस्तानात सैन्यावर एकूण 16 हल्ले झाले असून यात 37 सैनिक मारले गेले आहेत.
रविवारी दानासर भागात हल्ला झाला आहे. या हल्ल्यात सैनिकांसोबत 3 पोलीसही मारले गेल्याचे समजते. तपासणी नाक्याला बॉम्बस्फोटाने लक्ष्य करण्यात आले का गोळीबारात सैनिक मारले गेले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्ल्यानंतर सुमारे 2 तासांपर्यंत गोळीबार चालला होता. स्थानिक पोलीस आयुक्त बिलाल शब्बीर यांनी 4 सैनिक मारले गेल्याची पुष्टी दिली आहे. तर संबंधित तपासणी चौकीवर एकूण 21 सैनिक तैनात होते. दोन वर्षांपूर्वी देखील या तपासणी चौकीला लक्ष्य करण्यात आले होते.
संबंधित भागात बीएलएचा मोठा प्रभाव आहे. बलुचिस्तानातील सर्वात मागास भागांपैकी हा एक आहे. या भागात मोठ्या संख्येत चिनी नागरिकांचा वावर आहे. येथे चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार केला जात आहे. परंतु सुमारे 4 वर्षांपासून येथील काम बंद आहे. तरीही येथे चीनचे नागरिक मोठ्या संख्येत वास्तव्य करून आहेत. या चिनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानी सैन्याची एक विशेष तुकडी तैनात आहे.









