Saints Attacked In Sangli : सांगली येथे उत्तर प्रदेशातील चार साधूंवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये लहान मुलांना चोरण्याचा आरोप करत त्या साधूंना मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार राम कदम यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. ‘एएनआय’ने ट्विट करत याची माहिती दिली आहे. साधू पंढरपूरला दर्शनासाठी जात असताना सांगलीतून निघताना ही घटना घडल्याचे समजले आहे.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच सांगलीचे पोलिस अधिक्षक दीक्षित गेडाम म्हणाले की,आमच्याकडे याबाबत कोणतीही तक्रार किंवा औपचारिक अहवाल आलेला नाही, परंतु आम्ही व्हायरल झालेल्या व्हिडिओची चौकशी करत आहोत आणि वस्तुस्थितीची पडताळणी करत आहोत.”
राम कदम यांनी केली नाराजी व्यक्त
संतांच्या सोबतचा हा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. जे दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा होईल. पालघर साधू हत्याकांडात त्यावेळच्या सरकारने अन्याय केला, बदनामी केली पण महाराष्ट्राचे सध्याचे सरकार खपवून घेणार नाही. संतांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
पालघरमध्ये साधूंवर हल्ला
१६ एप्रिल २०२० रोजी पालघरमधील गडचिंचले गावात देखील अशी घटना घडली होती. गुजरातमधील सुरतहून जाणाऱ्या तीन साधूंना चोर असल्य़ाच्या संशयावरून वाटेतच अडवले आणि त्यांना जबर मारहाण करून हत्या करण्यात आली.हे तिघेही एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी सुरतला जात होते. ७० वर्षीय महाराज कल्पवृक्षगिरी, ३५ वर्षीय सुशील गिरी महाराज आणि त्यांचा एक चालक नीलेश तेलगणे अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ११० जणांना अटक केली आहे. त्यापैकी ९ अल्पवयीन आहेत. पुन्हा अशाच घटनेची पुनरावृत्ती सांगली जिल्ह्यात झाल्याने सोशल मिडियावर टीका-टीपण्णी केली जात आहे.