हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीपासून काही अंतरावर असलेल्या मालेगावजवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात 190 मेंढ्यांसह चौघांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मेंढ्या घेऊन जाणाऱ्या मालवाहू वाहनाची फ्लोअरिंगने भरलेल्या आणि उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाबरोबर समोरासमोर धडक झाली.
सलमान अली मौला अली, सत्यनारायण बलाई, लालू मीना, कादिर मेवाती, आलम अली अशी मृतांची नावे आहेत. मृतांमध्ये एक राजस्थानचा, तर इतर चौघेजण मध्य प्रदेशातील असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, राजस्थान येथून एक मालवाहतूकीचा ट्रक (HR-55-AJ-3111) 200 हून अधिक मेंढ्या घेऊन हैदराबादकडे निघाली होती. केबिनमध्ये ट्रक चालकासह चार जण बसले होते तर मागे एकजण मेंढ्या घेऊन बसला होता. गुरुवारी (25 मे) पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास हा ट्रक मालेगाव फाटा येथे येत असताना उड्डाणपुलाजवळ चालकाला डुलकी लागल्याने त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रकला धडक दिली.
या अपघातात ट्रकमधील तीन जण जागीच ठार झाले, तर गंभीर जखमी झालेल्या दोघांना पुढील उपचारासाठी नांदेडला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. या अपघातात 190 मेंढ्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच कळमनुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहायक पोलिस निरीक्षक रेखा शहारे, जमादार दिलीप पोले, संजय राठोड यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातातील दोन्ही जखमींना तातडीने कळमनुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले. मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.









