मृतांचा आकडा पोहोचला 18 वर
वृत्तसंस्था/वडोदरा
गुजरातमधील वडोदरा येथील पूल दुर्घटनेनंतर राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी अपघाताची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. प्राथमिक चौकशीनंतर, तज्ञ समितीने 4 अभियंत्यांची जबाबदारी निश्चित करत चौघांनाही तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. एन. एम. नाईकवाला (कार्यकारी अभियंता), यु. सी. पटेल (उपकार्यकारी अभियंता), आर. टी. पटेल (उपकार्यकारी अभियंता) आणि जे. व्ही. शाह (सहाय्यक अभियंता) अशी निलंबितांची नावे आहेत.
रस्ते आणि इमारत विभागाचे एक कार्यकारी अभियंता, दोन उपकार्यकारी अभियंता आणि एक सहाय्यक अभियंता यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. त्याचवेळी, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी राज्यातील इतर पुलांची तात्काळ आणि सखोल तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. महिसागर नदीवरील गंभीरा पूल कोसळल्याने मृतांचा आकडा 18 वर पोहोचला आहे, तर किमान तीन लोक अजूनही बेपत्ता आहेत. गुरुवारी आणखी पाच मृतदेह सापडले.









