बालाघाटमधील जंगलभागात संयुक्त मोहीम : शस्त्रास्त्रेही जप्त
वृत्तसंस्था/ बालाघाट
मध्यप्रदेशातील बालाघाट जिह्यात पुन्हा एकदा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. बालाघाटच्या गढी पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या चकमकीत पोलिसांनी तीन महिलांसह चार नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून एक इन्सास रायफल, एक एसएलआर रायफल, एक 303 रायफल आणि दैनंदिन वापराच्या इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. काही जखमी नक्षलवादी जंगलभागात पळून गेले असून पोलीस परिसरात त्यांचा शोध घेत आहेत.
बालाघाटामधील गढी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सूपखार वन परिक्षेत्रातील रौंडा फॉरेस्ट कॅम्पजवळ हॉकफोर्स, पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या बुधवारी चकमकीत 4 कट्टर नक्षलवादी ठार झाले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये 3 महिला नक्षलवाद्यांचा समावेश असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अतिरिक्त फौजफाटा मागवून सायंकाळी उशिरापर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली. हॉक फोर्स, सीआरपीएफ, कोब्रा आणि जिल्हा दलासह 12 हून अधिक पथके जंगलात शोधमोहीम राबवत आहेत.
माहिती देताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक ए. के. डाबर म्हणाले की, गढी पोलीस स्टेशन परिसरातील सूपखार वन परिक्षेत्रातील रौंडा वन छावणीजवळ शोधासाठी गेलेल्या सैनिकांचा नक्षलवाद्यांशी सामना झाला. या चकमकीत 4 कट्टर नक्षलवादी मारले गेले आहेत. तसेच काही नक्षलवादी जखमी झाले आहेत जे घनदाट जंगलाचा फायदा घेऊन पळून गेले.
मुख्यमंत्र्यांकडून सुरक्षा पथकाचे कौतुक
बालाघाटमधील चकमकीत नक्षलवाद्यांना ठार मारल्याबद्दल मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सुरक्षा दलाच्या पथकाचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित शहा 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद संपवण्यासाठी मोहीम राबवत आहेत. आमचे सरकारही या दिशेने गांभीर्याने काम करत आहे. आज बालाघाटमध्ये तीन महिला नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले आहे, त्यांच्याकडून शस्त्रs देखील जप्त करण्यात आली आहेत आणि इतर नक्षलवाद्यांशी पोलिसांची चकमक सुरूच आहे. ‘राज्यातून नक्षलवाद संपवण्याच्या दिशेने केलेल्या या यशस्वी कामगिरीबद्दल मध्यप्रदेश पोलिसांचे अभिनंदन’ असे ट्विट मोहन यादव यांनी केले आहे.









