आयएसएसएफ कनिष्ठ वर्ल्ड कप नेमबाजी : भारताने मिळविले डबल पोडियम फिनिश
वृत्तसंस्था/ सुहल, जर्मनी
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत रविवारी भारताने 10 मी. एअर रायफल सांघिक प्रकारात दोन पदके पटकावताना रौप्य व कांस्य मिळविले. भारताने या स्पर्धेत दोन दिवसात दुसऱ्यांदा एकाच प्रकारात दोन पदके मिळविली आहेत. नारायण प्रणव व ख्याती चौधरी यांनी रौप्य तर हिमांशू व शांभवी क्षीरसागर यांनी कांस्यपदक मिळविले. भारताची एकूण पदकसंख्या आता दुहेरी आकड्यात (2 सुवर्ण, 4 रौप्य, 4 कांस्य) पोहोचली आहे. सोमवारी अखेरच्या दिवशी आणखी दोन अंतिम लढती होणार आहेत.
ख्याती व प्रणव यांनी 38 नेमबाजांच्या पात्रता फेरीत 631.0 गुण नोंदवून दुसरे स्थान घेत अंतिम फेरीत स्थान मिळविले. अंतिम फेरीत त्यांना चीनच्या हुआंग युटिंग व हुआंग लिवानलिन यांच्याशी मुकाबला करण्याची संधी मिळाली. पात्रता फेरीत चिनी जोडीने 632.6 गुण मिळविले. अंतिम लढतीत भारतीय जोडीने चिनी जोडीशी तोडीस तोड खेळ केला आणि 14 सिरीजनंतर 14-14 अशी बरोबरी साधली. 15 व्या सिरीजमध्ये चिनी जोडीने केवळ 0.5 गुणांने बाजी मारताना सर्वप्रथम 16 गुण घेत सुवर्ण घेतले तर भारतीय जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
हिमांशू व शांभवी श्रावण क्षीरसागर यांनी पात्रता फेरीत 629.5 गुणांसह चौथे स्थान घेतले होते. कांस्यपदकाच्या लढतीत अमेरिकेच्या ग्रिफिन लेक व एलिजा स्पेन्सर यांच्याविरुद्ध ते 1-7 असे पिछाडीवर पडले होते. पदक हातातून निसटण्याची चिन्हे दिसू लागल्यावर भारतीय जोडीने झुंजार प्रदर्शन करीत 13-7 अशी आघाडी घेतली आणि शेवटी कांस्यपदक मिळविण्यात हिमांशू-शांभवी यशस्वी ठरले. शांभवी (253.0) व ओजस्वी ठाकुर (251.8) यांनी शनिवारी महिलांच्या एअर रायफल प्रकारात पहिले व दुसरे स्थान मिळविले. या स्पर्धेतील भारताचे ते पहिले 1-2 पोडियम फिनिश होते. इटलीच्या कार्लोटा सलाफियाने 230.5 गुण घेत कांस्यपदक मिळविले होते.
पुरुषांच्या 25 मी. पिस्तुल नेमबाजीत भारताच्या मुकेश नेलावल्लीने पात्रता फेरीत 573 गुण घेत सहावे स्थान मिळविल्यानंतर अंतिम फेरीत त्याने 22 गुण नोंदवत तिसरे स्थान मिळविले. त्याने हंगेरीच्या मेट रेडेक्सीला शेवटच्या एलिमिनेशन टप्प्यात शूटऑफमध्ये हरविले. पोलंडच्या व्हिक्टर लुकास कोपिवोडाने 23 गुण नोंदवत सुवर्ण, फ्रान्सच्या थॉमस क्लेमेंत चिनोर्सने 22 गुण नोंदवत रौप्य मिळविले. या स्पर्धेत 59 देशांतील 638 यू-21 नेमबाजांनी 17 मेडल इव्हेंट्समध्ये भाग घेतला आहे.









