वार्ताहर/कडोली
संततधार पावसामुळे कडोली येथील अयोध्यानगरात गोठ्याचे छप्पर कोसळून सुमारे 4 लाखांचे नुकसान झाले आहे. या पडझडीत दोन जनावरेही जखमी झाली आहेत. गेल्या 15 दिवसांपासून संततधार पाऊस आणि वाऱ्याने अनेक ठिकाणी घरांची पडझड सुरू आहे. रविवारी सकाळी येथील अयोध्यानगरातील रहिवासी भावकाण्णा जकानी मुतगेकर यांच्या गोठ्याचे छप्पर अचानकपणे पडल्याने गोंधळ उडाला. सदर छप्परात चार जनावरे बांधली होती. या जनावरांच्या अंगावरच थाट कोसळल्याने तातडीने थाटाची लाकडे बाजूला सरकवून जनावरांना बाजूला काढण्यात आले. यावेळी जनावरे किरकोळ जखमी झाली आहेत. तर या कोसळलेल्या छप्परामुळे भावकाण्णा मुतगेकर यांचे चार लाखाचे नुकसान झाले. यावेळी जि. पं. माजी उपाध्यक्ष अरुण काटांबळे, दिपक मरगाळे, गणपती चव्हाण यांनी पाहणी केली. मतुगेकर यांना भरपाई मिळवून देण्याची मागणी होत आहे.









