राज्यात एनडीआरएफची दहा पथके तैनात
वृत्तसंस्था /गुवाहाटी
आसाममधील पूरस्थिती अद्यापही गंभीर असून नऊ जिल्ह्यातील चार लाखांहून अधिक लोकांना या भीषण पुराचा फटका बसला आहे. काही भागात पुराचे पाणी हळूहळू ओसरत असले तरी अजूनही कित्येक लोक पुराच्या विळख्यात अडकून पडले आहेत. सरकारने मदतकार्य तीव्र केले आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची 10 पथके वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी बोलून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. पूरस्थिती गंभीर असल्यामुळे राज्य आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 10 तुकड्या आसाममधील पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. अनेक कठीण आव्हानांना तोंड देत एनडीआरएफने आतापर्यंत 123 हून अधिक लोकांसह अनेक पाळीव जनावरांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.









