प्रतिनिधी/ बेळगाव
पोलीस यंत्रणा निवडणूक बंदोबस्तात असताना शहर व उपनगरात गुन्हेगारांचा उच्छाद वाढला आहे. चोऱ्या, घरफोड्यांच्या घटना वाढल्या असून बंद घरांना लक्ष्य बनविण्यात येत आहे. सोमनाथनगर-हिंडलगा येथील बंद घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे 4 लाखाचे दागिने पळविले आहेत.
शुक्रवार दि. 5 मे रोजी दुपारी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून, रात्री बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मलिक किल्लेदार यांनी फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
चोरट्यांचा माग काढण्यासाठी ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. गुरुवार दि. 4 मे च्या रात्री 8.30 ते शुक्रवारी दुपारी 12.30 यावेळेत ही घटना घडली आहे. मलिक किल्लेदार हे आपल्या घराला कुलूप लावून परगावी गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरातील सुमारे 4 लाख रुपये किमतीचे 80 ग्रॅम सोन्याचे दागिने, एक मनगटी घड्याळ असा ऐवज पळविला आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.









