वृत्तसंस्था /नवी दिल्ली
चालू महिन्याच्या अखेरीस हंगेरीतील होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स संघटनेच्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारताचे चार भालाफेकधारक अॅथलिट्स पात्र ठरले आहेत. दरम्यान पात्र ठरलेला एक भालाफेकधारक दुखापतीमुळे या स्पर्धेसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही असे अखिल भारतीय अॅथलेटिक्स संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले. हंगेरीतील बुडापेस्ट येथे 19 ते 27 ऑगस्ट दरम्यान विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा होणार आहे. भारताचा ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकधारक नीरज चोप्राने यापूर्वीच आपली पात्रता सिद्ध केली असून त्याने डायमंड अॅथलेटिक्स स्पर्धेत चॅम्पियनशिप मिळवल्याने त्याला या आगामी स्पर्धेसाठी वाईल्ड कार्डद्वारे थेट प्रवेश देण्यात आला आहे. भारतातर्फे किशोर जेना, रोहित यादव आणि डी. पी. मनू यांनी विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली. दरम्यान रोहित यादवच्या दुखावलेल्या कोपरावर शस्त्रक्रिया करण्यात अल्याने तो या आगामी विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी होणार शकणार नाही. विश्वचषक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठीची पात्रतेची मुदत 30 जुलैला समाप्त झाली आहे. किशोर जेनाने श्रीलंकन राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावताना 84.38 मी. चे अंतर नोंदवले होते.
विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी कोणताही देश प्रत्येक क्रीडा प्रकारासाठी तीन अॅथलिट्सना पाठवू शकतो. दरम्यान चौथ्या अॅथलिट्सची निवड वाईल्ड कार्ड प्रक्रियेद्वारे होऊ शकते. नीरज चोप्राला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळाला असल्याने भारताचे उर्वरित तीन भालाफेकधारकांनी आपली पात्रता सिद्ध केल्याने त्यांनाही या स्पर्धेसाठी संधी मिळाली होती. पण रोहित यादव दुखापतीमुळे उपलब्ध होऊ शकणार नाही. पुरुषांच्या 20 कि. मी. चालण्याच्या शर्यतीमध्ये भारताचे आकाशदीप सिंग, विकास सिंग आणि परमजित बिस्ती, हे पात्र ठरले आहेत. महिलांच्या 20 कि. मी. चालण्याच्या शर्यतीत भारताची प्रियांका गोस्वामी ही एकमेव पात्र ठरली आहे. पुरुषांच्या तिहेरी उडीत प्रवीण चित्रावेल, अब्दुल्ला अबुबाकेर आणि एल्डोस पॉल यांचा समावेश राहिल. मुरली श्रीशंकर तसेच अविनाश साबळे यांनी यापूर्वीच या स्पर्धेचे तिकीट निश्चित केले आहे.









