ऐन भात कापणी हंगामात पुन्हा एन्ट्री
दोडामार्ग – प्रतिनिधी
हत्ती तिलारीत येणार की नाही अशा चर्चा गेले महिनाभर सुरु असताना अखेर शनिवारी रात्री तिलारी खोऱ्यातील हेवाळे गावात चार हत्ती कळपाचे दर्शन झाले. जवळपास महिनाभर या भागात हत्ती नव्हते त्यामुळे सगळ्यांच्या नजरा केवळ ओंकार या हत्तीवर होत्या. ऐन भातकापणी हंगामात हत्तीची पुन्हा एन्ट्री झाल्याने शेतकरी मात्र चिंतातूर झाला आहे. तिलारीतील हत्ती आपल्या मूळ अधिवासात गेले की तिलारीच्या बुडीत क्षेत्रात आहेत अशा चर्चा सुरु होत्या . कारण हत्ती जवळपास एक महिना तिलारी परिसरात दृष्टीस पडत नव्हते. शनिवारी रात्री ११ वा नंतर छोटी मादी (गौरी), मोठी मादी व दोन पिल्ले ( एकूण 4) अशा हत्तींचा वावर हेवाळे येथील उमाजी देसाई यांच्या घराच्या मागच्या बाजूला गेल लाईन जवळ असल्याचे समोर आले. ऐन भात कापणी हंगामात हत्तींचे आगमन होईल अशी जी शक्यता वर्तवली जात होती ती खरी ठरली आहे.









