वृत्तसंस्था/ शामली
उत्तरप्रदेशच्या शामली जिल्ह्यात युपी एसटीएफने सोमवारी रात्री एका चकमकीत मोठे यश मिळविले आहे. या चकमकीत 4 कुख्यात गुंड ठार झाले आहेत. तर चकमकीत पोलीस निरीक्षक सुनील दत्त गोळी लागल्याने जखमी झाले असून त्यांना गुरुग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मारले गेलेल्या गुंडांकडून एक कार अन् शस्त्रास्त्रs हस्तगत झाली आहेत.
चकमकीत ठार झालेले चारही गुंड हे मुस्तफा कग्गा टोळीशी संबंधित होते. शामली पोलीस आणि एसटीएफने संयुक्तपणे या चकमकीत अरशद नावाच्या कुख्यात गुंडाला ठार केले आहे. अरशद विरोधात 1 लाखाचे इनाम घोषित होते.
शामलीच्या झिंझाना येथे एसटीएफ आणि मुस्तफा कग्गा टोळीचे सदस्य आमने-सामने आले होते. दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. यात एसटीएफचे निरीक्षक सुनील दत्त जखमी झाले आहेत. तर कारवाईत चारही गुंड मारले गेले आहेत. मारले गेलेल्या गुंडांमध्ये टोळीचा प्रमुख अरशद, मंजीत, सतीश आणि एका अनोळखी इसमाचा समावेश आहे. पोलीस हे दीर्घ काळापासून अरशदचा शोध घेत होते. त्याच्या विरोधात 17 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे नोंद होते.









