वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेत भारतीय वंशाचा परिवार एका दुर्घटनेत मृत्यमुखी पडला आहे. न्यूयॉर्क येथील भारतीय वंशाच्या एका परिवाराचे चार सदस्य वेस्ट वर्जीनिया येथील एका अध्यात्मिक स्थळाच्या दिशेने जात असताना बेपत्ता झाले होते, शनिवारी या चारही जणांचे मृतदेह सापडले आहेत अशी माहिती मार्शल काउंटीचे शेरिफ माइक डौघर्टी यांनी रविवारी दिली आहे. आशा दीवाण (85 वर्षे), किशोर दीवाण (89 वर्षे), शैलेश दीवाण (86 वर्षे) आणि गीता दीवाण (84 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.
हा परिवार टोयोटा कॅमेरी कारमधून मार्शल काउंटी येथील प्रभुपाद पॅलेस ऑफ गोल्डच्या दिशेने प्रवास करत होता. त्यांची कार बिग व्हीलिंग क्रीक रस्त्याच्या कडेला सापडली आहे. ही कार दुर्घटनाग्रस्त असून चारही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही कार खोल दरीत कोसळल्याने जीवितहानी झाली आहे. याप्रकरणी तपास पूर्ण झाल्यावर अधिक माहिती देण्यात येणार असल्याचे शेरिफ डौघर्टी यानी सांगितले.
संबंधित वाहन आणि मृतदेह संबंधितांच्या परिवाराला सोपविण्यात आले आहेत. यापूर्वी हे चारही जण बेपत्ता झाल्याचे मानले गेले होते, त्यानंतर कौन्सिल ऑफ हेरिटेज अँड आर्ट्स इंडिया समवेत अनेक भारतीय-अमेरिकन संघटनांनी स्थानिक प्रशासनासोबत मिळून शोधमोहीम हाती घेतली होती.









