वृत्तसंस्था / कोलार
गेले तीन महिने टोमॅटोच्या दराने आभाळ गाठले आहे. देशभरात दर प्रतीकिलो 120 रुपये ते 180 रुपये अशा प्रकारे आहेत. सध्या जरी किमती काही प्रमाणात कमी होत असल्या तरी आजही त्या पावसाळ्याच्या मानाने चढ्याच आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागली असली तरी शेतकऱ्यांचा लाभ मोठ्या प्रमाणात झाला आहे. ज्या शेतकऱ्यांनी परिस्थिती लक्षात घेऊन जाणीवपूर्वक टोमॅटोची लागवड केली ते दीडदोन महिन्यांमध्ये कोट्याधीश झाले आहेत. कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील मुरली नामक शेतकऱ्याने गेल्या अवघ्या दीड
महिन्यांमध्ये टोमॅटोच्या विक्रीतून चार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.
यंदा त्याने टोमॅटो लागवडीवर भर दिला होता. त्याला प्रचंड लाभ त्याला मिळाला. तो प्रतिदिन टोमॅटो विक्रीसाठी 130 किलोमीटरचा प्रवास गेला दीड महिना करीत आहे. त्याला या कालावधीत प्रतिकिलो 40 रुपये ते 60 रुपये असा भाव मिळाला आहे. त्याच्यावर दीड कोटी रुपयांचे कर्ज होते. तरीही धोका पत्करुन त्याने टोमॅटोची लागवड केली होती. आता तो पूर्णत: कर्जमुक्त झाला आहे. आजवर कोणत्याही भाजीने त्याला मिळवून दिले नव्हते, तेव्हढे पैसे या केवळ दीड महिन्यांमध्ये त्याला मिळाले आहेत. शेतीधंदा नेहमीच तोट्यात असतो, असा एक समज शेतकरी समाजात पसरला आहे. त्यामुळे कित्येक शेतकरी नाईलाजाने शेती करतात, असेही बोलले जाते. तथापि, बाजारातील स्थिती, हवामान, मागणी आणि गुणवत्ता यांचा योग्य प्रकारे ताळमेळ घातल्यास टोमॅटोसारखे पीकही गरीब शेतकऱ्याला कोट्याधीश बनवू शकते असा आता मुरली हे अभिमानाने आणि स्वत:चेच उदाहरण देऊन सांगत आहेत.