मुंबईतील दाम्पत्यासह सहाजणांविरोधात गुन्हा नोंद
प्रतिनिधी/ पणजी
गोव्यात हॉटेल प्रकल्पात गुंतवणुकीचे आमिष दाखवून मुंबईतील एका महिलेला 4 कोटी ऊपयांना गंडवल्याची घटना घडली आहे. कांदोळी येथील बनावट हॉटेल दाखवून पीडित महिलेची लुबाडणूक केली आहे. याबाबत पीडित महिलेने सायबर गुन्हा विरोधी विभागाकडे तक्रार दाखल केली असता मुंबईतील एका दाम्पत्यासह सहाजणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांमध्ये प्रकाश मोटवानी, लता प्रकाश मोटवानी या मुंबईतील दाम्पत्यासह इतर सहा जणांनी पीडितेला कांदोळी येथील बनावट हॉटेल प्रकल्पात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून पैसे उकळले असल्याचा आरोप संशयितांवर आहे. पीडितेला गुंतवणूक केल्यानंतर मोठा परतावा देण्याचे आश्वासन मोटवानी आणि त्यांच्या सहकारी संशयितांनी दिले होते. परंतु तपासावरून असे दिसते की, हा सारा खटाटोप पैसे हडप करण्यासाठी होता. पीडितेने आरोपीवर विश्वास ठेवून 4 कोटी ऊपये दिले, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे, आरोपींच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली केली जात असून गैरव्यवहार केलेल्या निधीचा शोध घेतला जात आहे. लोकांनी कष्टाने कमावलेले पैसे गुंतविताना खबरदारी घेण्याचे आवाहन आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी केले आहे.









