कोल्हापूर / विनोद सावंत :
वर्षभरामध्ये एसटीमधून निम्या तिकीटात तब्बल 4 कोटी 2 लाख महिलांनी प्रवास केला आहे. त्यांना 82 कोटी 8 लाखांची सवलत देण्यात आली आहे. महायुती सरकारने महिला सन्मान योजना सुरू केल्यामुळे हे शक्य झाले आहे. महिलांना स्वस्त दरात प्रवास मिळत आहे. तर तोट्यात गेलेली एसटी फायदात येऊ लागली आहे. यामुळे ही योजना दुहेरी फायदा मिळवून देणारी ठरली आहे.
महायुती सरकारने अडीच वर्षामध्ये लोकाभिमुख योजना सुरू केल्या. यापैकी महिला सन्मान योजना एक आहे. राज्याच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली. महामंडळाने 17 मार्च 2023 पासून महिला सन्मान योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेमुळे एसटीतून प्रवास करणाऱ्यां महिलांची संख्या प्रचंड वाढली आहे. ज्या मार्गावरील एसटी बस रिकाम्या जात होत्या. त्या बस आता फुल्ल असतात. बसस्थानक प्रवाशांनी तुडूंब भरलेली असतात. एसटी बसण्यासाठी सोडाच उभारण्यासाठीही जागा मिळत नाही, अशी स्थिती आहे. एकीकडे या योजनेचा महिलांना फायदा होतच आहे. तसेच एसटी महामंडळालाही अच्छे दिन आले आहेत. 9 वर्ष तोट्यात असणारी एसटी सेवा यामुळे फायदात येत आहे.
महिला सन्मान योजनेचा जानेवारी ते 31 नोव्होंबर या अकरा महिन्यांत तब्बल 4 कोटी 2 लाख 34 हजार 933 महिलांनी लाभ घेतला आहे. यामध्ये कोल्हापुरातील 12 डेपोपैकी सर्वाधिक इचलकरंजी डेपोतून 63 लाख 5 हजार 372 महिलांनी लाभ घेतल्याची नोंद आहे. तर सर्वात कमी 6 लाख 39 हजार महिला प्रवासी गगनबावडा डेपोतील आहेत.
महिला सन्मान योजनेमुळे वर्षभरात 82 कोटी 8 लाख 86 हजार 413 रूपयांची सवलत दिली गेली आहे. यामध्ये कोल्हापुरातील 12 डेपोपैकी सर्वाधिक 14 कोटी 92 लाख 62 हजार 482 इतकी सवलत कोल्हापूर डेपोतून प्रवास करणाऱ्या महिलांना दिली आहे. त्या खालोखाल 12 कोटी 18 लाखांची सवलत इचलकरंजीच्या डेपोतून प्रवास करणारा महिल्यांना दिली गेली आहे.
महिला प्रवाशांमुळे 164 कोटींची कमाई
कोल्हापूर विभागांतर्गत महिला सन्मान योजनेचा 4 कोटीहून अधिक महिलांनी लाभ घेतला असून 11 महिन्यांत 164 कोटींचे उत्पन्न मिळाले आहेत. अशा विविध प्रकारच्या योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्यामुळेच कोल्हापूर एसटी ऑगस्टमध्ये तोट्यातून फायद्यात आला.
एसटी महामंडळाला 937 कोटींचे उत्पन्न
ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी असलेल्या योजनेसाठी राज्य शासन सवलतीच्या रकमेची प्रतिपूर्ती करते. गेल्या अडीच वर्षांत राज्य महामंडळाला प्रवासी भाड्यातून एकूण 731 कोटी रुपये उत्पन्न मिळाले, तर 207 कोटी रुपयांची प्रतिपूर्ती राज्य शासनाने केली.
अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिला सन्मान योजना सुरू झाल्यापासून एसटी प्रवाशांची संख्या वाढत आहे. गत वर्षामध्ये महिला सन्मान योजनेचा कोल्हापूर विभागातून 4 कोटीहून अधिक महिलांना लाभ मिळाला आहे. 82 कोटींची सवलत मिळाली आहे. विभागाकडून विविध प्रकारच्या योजना प्रभावीपणे राबविल्याने ऑगस्ट 2024 मध्ये 2 कोटी 16 लाखांचा नफा मिळविला आहे.
संतोष बोगारे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी कोल्हापूर
जानेवारी ते नोव्हेंबर 2024 ची महिला सन्मान योजनेची स्थिती
विभाग लाभार्थी संख्या सवलत रक्कम
कोल्हापूर 4524144 149265482
संभाजीनगर 4330755 85373471
इचलकरंजी 6305372 121830409
गडहिंगलज 4918019 73122277
गारगोटी 3628070 90505706
मलकापूर 2007794 43189459
चंदगड 1994154 39874136
कुरूंदवाड 3415721 53183854
कागल 4051247 64440011
राधानगरी 2529169 53385456
गगनबावडा 639947 15109354
आजरा 1890541 31606771
एकूण 40234933 820886413








