पती-पत्नीवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ सातारा
एमआयडीसीतील सिद्धार्थ इंन्डस्ट्रिजमध्ये अकाऊंटट पदावर कार्यरत असलेले ललित देशमाने व त्यांच्या पत्नी केतकी देशमाने यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अधिकाराचा गैरवापर करून बोगस कंपन्या स्थापन करून, खोटी कागदपत्रे, बीले, पैशाच्या पावत्या, बनावट बॅँक खाते तयार केले. आणि कच्चा माल विक्री केल्याचे दाखवून पैशांची अफरातफर केली. सन 2017 ते 2022 या सहा वर्षात 4 कोटी 47 लाख, 47 हजार 647. 78 रूपयाची आर्थिक फसवणूक केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सिद्धार्थ इन्डस्ट्रीजमध्ये ललीत मधुकर देशमाने हे अकाऊंट होते. परंतु त्यांच्यावरील विश्वासामुळे ते आर्थिक व्यवहाराबरोबरच मॅनेजर पदाचीही कामे करत होते. सन 2017 सालापासून त्यांनी अधिकाराचा गैरवापर करण्यास सुरूवात केली. त्यांच्या ताब्यात असणाऱ्या बनावट कागदपत्राच्या आधारे खोटी बिले, पैशाच्या पावत्या तयार केल्या. बनावट बॅँक खाते तयार केले. काही दिवसांनी पत्नी केतकी ललित देशमाने उर्फ मीना चव्हाण यांच्या मालकीच्या बोगस कंपन्या स्थापन केल्या. कंपनीतून कच्चा माल विक्री केल्याचे दाखवून खोट्या हिशोबाद्वारे कंपनीच्या अकांउन्टमध्ये अफरातफर केली. आणि 4 कोटी 47 लाख 47 हजार 647.78 रूपयांची आर्थिक फसवणूक केली. याची माहिती मिळताच कंपनीचे मॅनेजर दुर्गेश जंगम यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. या तक्रार अर्जाची चौकशीनंतर ललित देशमाने व केतकी देशमाने या पती-पत्नीवर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करत आहेत.








