अमेरिकेतील एका ऍपल स्टोअरमध्ये चार कोटीच्या मोबाईल्सची चोरी झाली आहे. चोरी झालेल्या मोबाईल्सची संख्या 436 असून अशा प्रकारची आणि इतक्या मोठय़ा प्रमाणातली ही अमेरिकेमधील पहिलीच चोरी असावी असे बोलले जात आहे. हे ऍपल स्टोअर अमेरिकेच्या सिएटल शहरात आहे. त्याच्या शेजारी असणाऱया एका कॉफीच्या दुकानाची भिंत फोडून चोरटय़ांनी या स्टोअरमध्ये प्रवेश मिळविला, अशी माहिती तपास यंत्रणांकडून देण्यात आली आहे.
भिंत फोडून चोरटे स्टोअरच्या मागच्या खोलीत पोहचले. त्याच ठिकाणी अनेक महागडे मोबाईल हँडसेटस् ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर या चोरटय़ांनी डल्ला मारला. या मोबाईल्सची एकंतर किंमत 5 लाख डॉलर्स किंवा 4.10 कोटी रुपये आहे. ऍपल कंपनीचे विभागीय व्यवस्थापक एरिक मार्क्स यांना नंतर यासंबंधी एक संदेश पाठविण्यात आला होता. तथापि, त्यांचा विश्वास बसला नाही.
आता या कॉफीच्या दुकानाच्या मालकाची चौकशी केली जात आहे. त्याच्या दुकानातून चोरटे भिंत फोडून ऍपलच्या स्टोअरमध्ये शिरले कसे आणि त्यावेळी या दुकानाचा चालक आणि मालक काय करत होते, यासंबंधी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. रात्री चोरटय़ांनी प्रथम हे कॉफीचे दुकान फोडले आणि नंतर त्यांची भिंत फोडून आत ऍपल स्टोअरमध्ये प्रवेश केला, असे सांगण्यात येत आहे. खरी कहाणी तपासानंतरच उघड होईल, अशी शक्यता आहे. कॉफी दुकानाचा मालक माईक अटकिन्सन याने आपल्या दुकानाच्या फोडलेल्या भिंतीची व्हिडीओग्राफी इंटरनेवर प्रसिद्ध केली आहे. दोन व्यक्तींनी आपले दुकान फोडून आत प्रवेश केला आहे, असे त्याचे म्हणणे आहे. एकंदर, अमेरिकेत या चोरीमुळे एक सनसनाटी निर्माण झाली आहे, एवढे निश्चित आहे.









