नव्या वर्षाची भेट: युएईच्या शासकीय कार्यालयांमध्ये साडेचार दिवसांचा वर्किंग वीक
वृत्तसंस्था / दुबई
संयुक्त अरब अमिरात (युएई) स्वतःच्या कर्मचाऱयांना नव्या वर्षात ‘आरामा’ची भेट देणार आहे. 1 जानेवारी 2022 पासून तेथे आठवडय़ात केवळ साडेचार दिवस काम होणार आहे. उर्वरित अडीच दिवस सुटी राहणार आहे. युएई सरकारने याविषयी अधिकृत वक्तव्य जारी केले आहे.
पुढील काही दिवसांमध्ये परिपत्रक सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पाठविण्यात येणार आहे. वीकली वर्किंग ऑवर्स म्हणजेच आठवडय़ात कामाचे दिवस कमी करणारा युएई जगातील पहिला देश ठरला आहे. जगातील बहुतांश देशांमध्ये फाइव्ह डे वर्किंग वीक कल्चर (संस्कृती) आहे.
जागतिक बाजारपेठेतील पॅटर्न्सचे अनुकरण करू इच्छित असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. 1971-1999 पर्यंत देशात 6 दिवस काम केले जायचे. 1999 मध्ये यात बदल करून 5 दिवस आणि आता साडेचार दिवस कामकाजासाठी निश्चित करण्यात आले आहेत.
खासगी क्षेत्रातही अंमलबजावणी
नवे वर्किंग कॅलेंडर 1 जानेवारी 2022 पासून लागू करण्याची योजना आखण्यात आली आहे. युएईत कर्मचाऱयांसाठीचे नियम पाहता लवकरच देशातील खासगी क्षेत्रही अशाप्रकारचे पाऊल उचलणार असल्याचे मानले जात आहे.
शुक्रवारी केवळ अर्धा दिवस काम
शुक्रवारी अर्धा दिवस काम म्हणजेच हाफ-डे वर्किंग राहणार आहे. शनिवार आणि रविवारी पूर्णपणे सुटी असेल. आदेशानुसार शुक्रवारी कर्मचाऱयांना वर्क फ्रॉम होम करण्याची इच्छा असल्यास त्यांना याची मंजुरी असणार आहे. दुबई आणि अबुधाबीतील कर्मचारी सरकारच्या या घोषणेमुळे सुखावले आहेत. प्रशासन लवकरच देशातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये देखील नव्या नियमाची अंमलबजावणी करणार आहे. याविषयी स्वतंत्र परिपत्रक काढले जाऊ शकते. पण शाळा आणि खासगी क्षेत्रासंबंधी अद्याप कुठल्याही प्रकारचे दिशानिर्देश जारी करण्यात आलेले नाहीत. कंपन्या यासंबंधी स्वतः निर्णय घेणार आहेत.
उत्पादकतेत वाढ करण्याचा उद्देश
आम्ही आमच्या कर्मचाऱयांना कामाच्या बदल्यात त्यांना तितकाच आराम दिल्यास त्यांच्या उत्पादकतेत वाढ होणार आहे. यातून देशालाच लाभ होणार असल्याचे युएई प्रशासनाच्या अधिकृत माध्यम शाखेने म्हटले आहे. युएईने 2006 मध्ये यापूर्वी वर्किंग वीक पॅटर्न बदलला होता. तेव्हा गुरुवार-शुक्रवारच्या ऐवजी शुक्रवार-शनिवारी सुटीची घोषणा करण्यात आली होती.









