अमरनाथ यात्रा मुदतीपूर्वी समाप्त
वृत्तसंस्था / श्रीनगर
वार्षिक अमरनाथ यात्रेच्या शेवटच्या दिवशी दक्षिण काश्मीर हिमालयातील पवित्र गुहा मंदिरात बर्फाचे शिवलिंग पाहण्यासाठी 6,000 हून अधिक भाविकांनी भेट दिल्यामुळे बाबा बर्फानींचे दर्शन घेणाऱ्या यात्रेकरूंची एकूण संख्या 4.14 लाख झाली. खराब हवामान आणि गुहेकडे जाणाऱ्या मार्गावरील अडथळ्यांमुळे यंदा मुदतीपूर्वीच अमरनाथ यात्रा रोखावी लागली. गेल्या वर्षी 5.10 लाखांहून अधिक यात्रेकरूंनी या गुहा मंदिराला भेट दिली होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अमरनाथ यात्रा सहसा रक्षाबंधनाच्या दिवशी संपते. यावर्षी ही यात्रा 9 ऑगस्ट रोजी संपणार होती. मात्र, मुसळधार पावसामुळे महत्त्वाची दुरुस्ती आणि देखभालीची कामे सुरू असल्याचे सांगून अधिकाऱ्यांनी यात्रा एका आठवड्याने कमी करण्याचा निर्णय घेतला.
3 जुलै रोजी यात्रा सुरू झाल्यापासून आतापर्यंत 4,14,311 यात्रेकरूंनी पवित्र गुहा मंदिराला भेट दिली आहे. यंदाच्या यात्रेच्या अखेरच्या दिवशी 3,800 मीटर उंचीवर असलेल्या पवित्र गुहा मंदिरात एकूण 6,497 यात्रेकरूंनी भेट दिली. यात्रेकरूंमध्ये 4,586 पुरुष, 1,299 महिला, 62 मुले, 51 साधू, पाच साध्वी आणि 494 सुरक्षा दलाचे कर्मचारी होते.
श्री अमरनाथजी यात्रा ही भक्तांसाठी सर्वात पवित्र धार्मिक तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. या यात्रेसाठी प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. ही यात्रा पहलगाम हल्ल्यानंतर झाली. एप्रिलमधील पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी 26 नागरिकांचा बळी घेतला होता. यंदा अमरनाथ यात्रामार्गात लष्कर, बीएसएफ, सीआरपीएफ, एसएसबी आणि स्थानिक पोलिसांची तैनाती वाढवली होती. सुरक्षेच्या कारणास्तव यावर्षी यात्रेकरूंसाठी हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध नव्हती.








